स्पोर्ट्स डेस्क, नवी दिल्ली: रेल्वेचा 23 वर्षीय गोलंदाज जमशेद आलमने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये आपल्या पदार्पणाच्या सामन्यात धमाल उडवून दिली. जमशेद आलमने टी-20 पदार्पणात सौराष्ट्रविरुद्ध सलग चार चेंडूंवर चार विकेट्स घेतल्या. अशी कामगिरी करणारा तो तिसरा भारतीय गोलंदाज ठरला आहे. जमशेद आलमने टी-20 पदार्पणात पाच बळी (फाइव्ह विकेट हॉल) देखील घेतले. त्याच्या शानदार गोलंदाजीमुळे रेल्वेने सौराष्ट्रविरुद्ध विजय नोंदवला.
यूपी टी-20 लीग आणि टी-20 मुंबई लीग खेळलेल्या जमशेद आलम याला रेल्वेकडून पहिल्यांदाच वरिष्ठ संघात खेळण्याची संधी मिळाली. सौराष्ट्रविरुद्ध पदार्पण करताना जमशेद आलमने आपल्या स्पेलच्या पहिल्याच षटकात सलग चार चेंडूंवर चार विकेट्स घेतल्या. सौराष्ट्रच्या डावातील चौथ्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर त्याने हार्विक देसाई, चौथ्या चेंडूवर प्रेरक मांकड, पाचव्या चेंडूवर रुचित अहिर आणि सहाव्या चेंडूवर सम्मर गज्जर याला बाद केले.
तिसऱ्यांदा भारतीय गोलंदाजाने पदार्पणात केला हा पराक्रम
जमशेद आलमच्या आधी कर्नाटकच्या अभिमन्यू मिथुनने नोव्हेंबर 2019 मध्ये हरियाणाविरुद्ध 20व्या षटकात सलग चार विकेट्स घेतल्या होत्या. विदर्भाच्या दर्शन नळकांडेनेही नोव्हेंबर 2021 मध्ये कर्नाटकविरुद्ध चार चेंडूंवर चार विकेट्स घेतल्या होत्या. दर्शन नळकांडेनेही 20 व्या षटकात हा पराक्रम केला होता. जमशेद आलमने आपल्या स्पेलच्या पहिल्याच षटकात हा पराक्रम केला. त्याने चार षटकांत 38 धावा देऊन पाच फलंदाजांना आपली शिकार बनवले. क्रिकइन्फोच्या अहवालानुसार, पुरुषांच्या T20 क्रिकेटमध्ये आपल्या पदार्पणाच्या सामन्यात पाच विकेट्स घेणारा तो सहावा भारतीयही बनला आहे.
कोण आहे जमशेद आलम?
जमशेद आलमने यूपी T20 लीगमध्ये 'मेरठ मॅव्हरिक्स'चे प्रतिनिधित्व केले आहे. याशिवाय तो रेल्वेकडून देशांतर्गत अंडर-२३ स्पर्धा 'सीके नायडू ट्रॉफी'चाही भाग राहिला आहे. या वर्षाच्या सुरुवातीला तो 'T20 मुंबई लीग'मध्ये 'आकाश टायगर्स MWS' साठीही खेळताना दिसला होता.
या सामन्याबद्दल बोलायचे तर रेल्वेच्या संघाने 20 षटकांत पाच गड्यांच्या मोबदल्यात 182 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात सौराष्ट्रचा संघ आठ गड्यांच्या मोबदल्यात केवळ 153 धावा करू शकला आणि 29 धावांनी सामना गमावला.
