नवी दिल्ली. Ind vs SA 2nd ODI Match : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात बुधवारी रायपूर येथे हायस्कोअरींग सामना झाला. सामन्यात एकूण 720 धावा झाल्या आणि 11 विकेट पडल्या. प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात आलेल्या भारताने निर्धारित 50 षटकांत विराट कोहली व गायकवाडच्या शतकांच्या बळावर 5 गडी गमावून 358 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेने हे आव्हान 49.2 षटकांत 6 गडी गमावून लीलया पार केले.
या विजयासह, दक्षिण आफ्रिकेने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. रांची येथे झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने 17 धावांनी विजय मिळवला होता. दोन्ही संघांमधील मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना शनिवारी विशाखापट्टणम येथे खेळला जाईल. 350 पेक्षा जास्त धावांचे लक्ष्य दिल्यानंतरही भारताने सामना गमावण्याची ही दुसरी वेळ आहे. त्यांचा मागील पराभव 2019 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध झाला होता.
तथापि, रायपूरच्या शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या सामन्यात टीम इंडियाला तीन चुका भारी पडल्या व सामना गमवावा लागला. चला त्यांच्यावर एक नजर टाकूया.
1) खराब क्षेत्ररक्षण
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाने अत्यंत खराब क्षेत्ररक्षण केले. रवींद्र जडेजाने सीमारेषेवर दोनदा खराब फिल्डींग केली त्यामुळे दक्षिण आफ्रिकेच्या खात्यात आठ धावा जमा झाल्या. वॉशिंग्टन सुंदर आणि यशस्वी जयस्वाल यांनीही खराब कामगिरी केली. शिवाय, भारतीय संघाने ओव्हरथ्रोद्वारे अतिरिक्त धावा दिल्या. सुंदरने एक झेल सोडला, ही चूक टीम इंडियाला महागात पडली.
2) खराब गोलंदाजी
या सामन्यात भारतीय गोलंदाज निष्प्रभ ठरले. फक्त अर्शदीप सिंग आणि रवींद्र जडेजा यांनी 6 पेक्षा कमी इकॉनॉमी रेटने धावा दिल्या. तथापि, हर्षित राणा, प्रसिद्ध कृष्णा, वॉशिंग्टन सुंदर आणि कुलदीप यादव या सर्वांचा इकॉनॉमी रेट 7 पेक्षा जास्त होता. 10 पेक्षा जास्त इकॉनॉमी रेटने धावा देत कृष्णा सर्वात महागडा गोलंदाज ठरला. भारताला त्याच्या क्षेत्ररक्षणाबरोबरच गोलंदाजीवरही कठोर परिश्रम करण्याची आवश्यकता आहे.
3) संथ फलंदाजी
विराट कोहली (102) आणि ऋतुराज गायकवाड (105) यांनी तिसऱ्या विकेटसाठी 195 धावांची भागीदारी केली. 86 चेंडू शिल्लक असताना टीम इंडियाच्या धावफलकावर 257 धावा होत्या. तेथून भारताला 370-380 धावा करण्याची सोयीची संधी होती. तथापि, वॉशिंग्टन सुंदर आणि रवींद्र जडेजाच्या संथ फलंदाजीमुळे भारत 20-30 धावांनी कमी पडला.
वॉशिंग्टन सुंदरने 8 चेंडूत 1 धाव केली, तर जडेजाने 27 चेंडूत 24 धावांचे योगदान दिले. शेवटच्या षटकात जडेजाने चौकार मारला. त्याआधी त्याने केवळ एकेरी-दुहेरी धावा काढून संथ खेळी केली. या चुका भारतीय संघाला चांगल्याच महाड्या ठरल्या. दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेने सातत्यपूर्ण धावगती राखली आणि विजय निश्चित केला.
