नवी दिल्ली. Shoaib Akhtar on No Handshake Controversy: सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने आशिया कप 2025 च्या सहाव्या सामन्यात पाकिस्तानचा 7 विकेट्सने धुव्वा उडवला. भारताने सर्वच क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत पाकिस्तानला चारीमुंड्या चीत केले. भारताने पाकिस्तानला 20 षटकांत 9 विकेट्सच्या मोबदल्यात फक्त 127 धावांवर रोखले. त्यानंतर टीम इंडियाने 15.5 षटकांत केवळ तीन विकेट्स गमावून आरामात लक्ष्याचा पाठलाग केला. 

भारताच्या या विजयावरून दिसून आले की, भारताचे 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरू आहे. पुन्हा एकदा पाकिस्तानी संघ क्रिकेटच्या मैदानावर पराभूत झाला आहे. 

(IND vs PAK Asia Cup 2025) सामन्यातील विजयानंतर, आणखी एक मोठा वाद समोर आला, जिथे भारतीय खेळाडूंनी पाकिस्तान संघाशी हस्तांदोलन केले नाही आणि ते थेट ड्रेसिंग रूममध्ये गेले. आता पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने या प्रकरणावर नाराजी व्यक्त केली आहे.

शोएब अख्तरला राग अनावर -

खरंतर, माजी पाकिस्तानी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर (Shoaib Akhtar No handshake Controversy) ने सामना संपल्यानंतर हस्तांदोलन न करण्याच्या भारतीय संघाच्या निर्णयावर संताप व्यक्त केला आहे. एका पाकिस्तानी कार्यक्रमात बोलताना तो म्हणाला,

मी बोलण्याच्या स्थितीत नाहीये. खूप निराशाजनक आहे. भारताला सलाम, पण त्याला राजकीय रंग देऊ नका. हा फक्त एक क्रिकेट सामना आहे. आम्ही तुमच्यासाठी चांगल्या गोष्टी सांगितल्या आहेत, आम्ही बरेच काही सांगू शकतो. भांडणे घरीही होतात. ते विसरून जा, पुढे जा. हा एक खेळ आहे, हस्तांदोलन करा आणि तुमची महानता दाखवा.

    हे लक्षात घेण्यासारखे आहे की सामन्यानंतर पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आघा सामन्यानंतरच्या प्रेजेंटेशनला उपस्थित राहिला नाही. या निर्णयावर शोएब अख्तरने पाक कर्णधाराचे समर्थन केले आणि म्हटले की सलमान अली आघा सामन्यानंतरच्या सादरीकरणाला उपस्थित न राहून योग्य काम केले. गुड.

    IND vs PAK: भारताचा सलग दुसरा विजय

    भारत-पाकिस्तान सामन्यात (India vs Pakistan Asia Cup 2025), पाकिस्तान संघाचा कर्णधार सलमान आगा यांनी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तान संघाने निर्धारित 20 षटकांत 9 गडी गमावून 127 धावा केल्या. कुलदीप यादवने 18 धावांत 3 गडी बाद केले, तर बुमराह आणि अक्षरने प्रत्येकी दोन गडी बाद केले. हार्दिक आणि वरुणने प्रत्येकी एक गडी बाद केला.

    प्रत्युत्तरादाखल, भारतीय संघाचा सलामीवीर अभिषेक शर्माने 31 धावांची खेळी केली ज्यामध्ये 4 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश होता.

    कर्णधार सूर्यकुमार यादवने 37 चेंडूत 5 चौकार आणि 1 षटकारासह नाबाद 47 धावा केल्या. तिलक वर्माने 31 चेंडूत 31 धावा केल्या आणि शिवम दुबे 10 धावांवर नाबाद राहिला. भारताने हे लक्ष्य केवळ 15.5 षटकात पूर्ण केले आणि पाकिस्तानचा 7 गडी राखून पराभव केला. आशिया कप 2025 मध्ये भारताचा हा सलग दुसरा विजय होता.