जेएनएन, नागपूर: महाराष्ट्रात गणेशोत्सवाच्या काळात ज्येष्ठ गौरी पूजनाला विशेष महत्त्व आहे. माहेरवाशिणी म्हणून गौरींचे अडीच दिवस मोठ्या भक्तिभावाने आदरातिथ्य केले जाते. घरातील परंपरेनुसार गौरींची मांडणी, पूजाविधी आणि नैवेद्याच्या पद्धती वेगवेगळ्या असल्या तरी या तीन दिवसांत गौरींचे स्वागत, पूजन आणि निरोप असा क्रम पाळला जातो. जाणून घेऊया ज्येष्ठ गौरी पूजनाची तीन दिवसांची परंपरा आणि या काळात गौरींचे आदरातिथ्य कसे केले जाते.

गौरींच्या मांडणीच्या विविध पद्धती
महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये गौरींच्या पूजेची पद्धत आणि मांडणी वेगवेगळी आढळते. काही कुटुंबांमध्ये गौरींचे मुखवटे असतात, तर काही ठिकाणी पाणवठ्यावर जाऊन पाच, सात किंवा अकरा खडे आणून त्यांची गौरी म्हणून पूजा केली जाते. काही घरांमध्ये पाच मडक्यांची उतरंड करून त्यावर गौरींचे मुखवटे लावले जातात. या उतरंडीला साडी-चोळी नेसवून गौरींची पूजा केली जाते.

काही कुटुंबांमध्ये गहू, तांदूळ, ज्वारी, हरभरा किंवा डाळी यांपैकी एक-दोन धान्यांची रास करून त्यावर गौरींचे मुखवटे ठेवले जातात. काही ठिकाणी सुपात धान्याची रास करून त्यावर मुखवटा ठेवण्याची पद्धत आहे. गहू आणि तांदळाने भरलेल्या तांब्यांवरही गौरींचे मुखवटे ठेवून पूजा केली जाते.

काही भागात तेरड्याची रोपे मुळासकट आणून त्यांची गौरी म्हणून पूजा केली जाते. या रोपांची मुळे म्हणजे गौरींची पावले, अशी श्रद्धा आहे. आधुनिक काळात गौरींच्या मांडणीतही बदल झाला असून धातू, माती, कागद तसेच विविध सजावटीच्या साहित्यापासून गौरींचे स्वरूप साकारले जाते. काही घरांमध्ये गौरींसोबत त्यांची मुले, म्हणजेच एक मुलगा आणि एक मुलगी, यांचीही मांडणी केली जाते.

पहिला दिवस : गौरी आवाहन
गौरींच्या आगमनाचा पहिला दिवस हा गौरी आवाहनाचा असतो. आपापल्या कुटुंबाच्या परंपरेनुसार गौरींना घरात आणले जाते. ज्या महिलेच्या हातात गौरी असतात, तिचे घराच्या उंबरठ्यावर दूध आणि पाण्याने पाय धुतले जातात. त्यानंतर पायांवर कुंकवाने स्वस्तिक काढले जाते.

घराच्या दरवाजापासून गौरींची स्थापना ज्या ठिकाणी केली जाणार आहे, तिथपर्यंत लक्ष्मीच्या पावलांचे ठसे उमटवले जातात. ताट-चमचा किंवा घंटा वाजवत गौरींचे घरात स्वागत केले जाते. त्यानंतर घरातील समृद्धी, धान्य, दुध-दुभते आणि अन्य महत्त्वाच्या वस्तू गौरींना दाखवण्याची प्रथा काही ठिकाणी आहे. घरात सुख-समृद्धी नांदावी, अशी प्रार्थना केली जाते.

    काही भागांमध्ये तेरड्याची रोपे एकत्र बांधून त्यांची प्रतिमा तयार केली जाते. त्यावर मातीचा मुखवटा लावून साडी आणि दागदागिने घालून गौरी सजवल्या जातात. पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांत पहिल्या दिवशी संध्याकाळी गौरींना भाजी-भाकरीचा नैवेद्य दाखवण्याचीही परंपरा आहे.

    दुसरा दिवस : ज्येष्ठा नक्षत्रावर गौरी पूजन
    गौरी पूजनाचा मुख्य दिवस ज्येष्ठा नक्षत्राचा असतो. या दिवशी सकाळी गौरी किंवा महालक्ष्मींची विधिवत पूजा आणि आरती केली जाते. त्यानंतर विविध फराळाचे पदार्थ नैवेद्य म्हणून अर्पण केले जातात. रव्याचे लाडू, बेसनाचे लाडू, करंजी, चकली, शेव आणि गुळपापडीचे लाडू यांचा फराळात समावेश असतो.

    गौरी पूजनाच्या दिवशी घरच्या पद्धतीनुसार विविध प्रकारचे पारंपरिक पदार्थ तयार केले जातात. पुरणपोळी, ज्वारीच्या पिठाची आंबील, अंबाडीची भाजी, सोळा भाज्यांची एकत्र भाजी, दिवेफळ यांसह शेंगदाण्याची आणि
    डाळीची चटणी, पंचामृत, पडवळ घातलेली ताकाची कढी, कटाची आमटी, विविध प्रकारच्या भजी, पापड आणि लोणचे असे पदार्थ नैवेद्यात ठेवले जातात.

    अनेक ठिकाणी हा नैवेद्य केळीच्या पानावर वाढण्याची पद्धत आहे. संध्याकाळी पुन्हा गौरींची आरती केली जाते. याच दिवशी काही भागांत महिलांसाठी हळदीकुंकवाचा कार्यक्रम आयोजित केला जातो. गौरींच्या दर्शनासाठी येणाऱ्या महिला आणि मुलींचे आदरपूर्वक स्वागत केले जाते.

    तिसरा दिवस : गौरींचा निरोप
    तिसऱ्या दिवशी म्हणजे मूळ नक्षत्रावर गौरी किंवा महालक्ष्मींचा निरोप घेतला जातो. सकाळी पोवते किंवा सुताच्या गाठी तयार करण्याची प्रथा आहे. या सुतामध्ये हळदी-कुंकू, सुकामेवा, बेलफळ, फुले, झेंडूची पाने, काशीफळाचे फूल आणि रेशमी धागा यांसारख्या वस्तू घालून गाठी पाडल्या जातात.

    यानंतर गौरींची पूजा आणि आरती करून नैवेद्य दाखवला जातो. गोड शेवयांची खीर आणि उडीद डाळीचा भाजलेला पापड यांचा नैवेद्यात समावेश केला जातो. गौरींना पुढील वर्षी पुन्हा येण्याचे आमंत्रण देत त्यांचा भावपूर्ण निरोप घेतला जातो.

    मातीच्या किंवा इतर विसर्जनयोग्य गौरींचे विधिवत विसर्जन केले जाते. मात्र धातूच्या किंवा कायमस्वरूपी असलेल्या गौरींच्या मूर्तींचे विसर्जन केले जात नाही. काही ठिकाणी विसर्जनानंतर परतताना थोडी वाळू घरी आणून ती घरभर आणि परसातील झाडांवर टाकण्याची प्रथा आहे. यामुळे घरात समृद्धी नांदते आणि झाडाझुडपांचे कीटकांपासून संरक्षण होते, अशी लोकमान्यता आहे.

    दोरकाचीही केली जाते पूजा
    गौरी पूजनाच्या तिसऱ्या दिवशी महाराष्ट्रातील काही ग्रामीण भागांमध्ये गौरींच्या पूजेबरोबरच सुताच्या गुंड्यालाही विशेष महत्त्व दिले जाते. सुताच्या गुंड्याला सोळा गाठी देऊन त्याची पूजा केली जाते. हा दोरा हळदीने रंगवला जातो. घरातील सुवासिनी हा दोरा गळ्यात बांधतात आणि नवीन पीक येईपर्यंत तो धारण करण्याची प्रथा काही ठिकाणी आहे.

    आश्विन वद्य अष्टमीला हा दोरा गळ्यातून काढून त्याची पुन्हा पूजा केली जाते. या दोऱ्यालाच महालक्ष्मीचे प्रतीक मानण्याची परंपरा काही ग्रामीण समाजांमध्ये आढळते.

    अशा प्रकारे ज्येष्ठ गौरींचे अडीच दिवसांचे आदरातिथ्य हे केवळ धार्मिक विधी नसून महाराष्ट्रातील विविध भागांतील कुटुंबपरंपरा, खाद्यसंस्कृती आणि लोकश्रद्धा जपणारा उत्सव आहे. घरच्या परंपरेनुसार गौरींचे स्वागत, पूजा, नैवेद्य आणि निरोपाच्या पद्धतीत फरक असला तरी या उत्सवामागील श्रद्धा आणि माहेरवाशिणीच्या रूपातील गौरींच्या आदरातिथ्याची भावना कायम आहे.

    हेही वाचा: Gouri Pujan 2026: महालक्ष्मी गौरींनी केला असुरांचा संहार; जाणून घ्या ज्येष्ठा गौरी पूजनामागची प्रचलित आख्यायिका

    Disclaimer: या लेखात सांगितलेले उपाय/फायदे/सल्ला आणि विधान फक्त सामान्य माहितीसाठी आहेत. दैनिक जागरण येथे या लेख वैशिष्ट्यात लिहिलेल्या गोष्टींचे समर्थन करत नाही. या लेखात अंतर्भूत माहिती विविध माध्यमे/ज्योतिषी/पंचांग/प्रवचने/मान्यता/धर्मग्रंथ/दंतकथा यांतून संग्रहित केली गेली आहे. वाचकांना विनंती आहे की लेखाला अंतिम सत्य किंवा दावा मानू नये आणि आपल्या विवेकबुद्धीचा वापर करावा.