जेएनएन, मुंबई. Pandharpur Wari 2024 Yatra: पंढरपूर येथील चंद्रभागा नदी राज्यातील प्रमुख नद्यांमध्ये स्थान दिले गेले आहे. चंद्रभागा नदीला धार्मिक महत्व असून, दरवर्षी विविध प्रसंगी मोठ्या संख्येने भाविक याठिकाणी नदीचे दर्शन (Ashadhi Wari 2024) आणि पवित्र आंघोळ करण्यासाठी उपस्थित राहत असतात. चंद्रभागा नदी ही भीमा नदीची उपनदी आहे. भीमाशंकर येथून ही नदी भीमा (भिवरा) इंद्रायणी- भामा- नीरा यांना सोबत घेत पंढरपुरात दाखल होते. आषाढी वारी विशेष आजच्या या लेखात आपण पंढरपुरातील चंद्रभागा नदी बद्दल जाणून घेणार आहोत.

धार्मिक महत्व 

पंढरपूरमध्ये वर्षातून चार मोठ्या एकादशीला यात्रा भरतात यामध्ये चैत्री, आषाढी, माघी व कार्तिकी. एकादशीचा समावेश आहे. यापैकी आषाढी एकादशीला भरणाऱ्या यात्रेत 10-15 लाख मराठी व कानडी  भाषिक भक्त सहभागी होत असतात. असे सांगितले जाते की, पुंडलिकाच्या काळात विटेवर पूर्वमुखी पांडुरंग आणि समोर भीमा नदीच्या पात्रात पश्चिमाभिमुखी हरिमूर्ती होती. हे मंदिर आता वाहून गेले आहे. पण त्याचा मोठा चौथरा शिल्लक आहे, त्याला चौफाळा म्हणतात. हरि मंदिर भीमेच्या पात्रात असल्याचा उल्लेख कै. काशिनाथ उपाध्याय उपाख्य बाबा पाध्ये यांनी केला असल्याची आख्यायिका सांगितली जाते. वारकरी संप्रदायाच्या घोषवाक्यात ‘पुंडलिक वरदा हरि विठ्ठल’ असा तीर्थ व क्षेत्र देवतांचा उल्लेख असतो. (हरि ही तीर्थदेवता आणि विठ्ठल ही क्षेत्रदेवता!) दीक्षा मंत्रातही ‘रामकृष्णहरि’ असा तीन देवतांचा उल्लेख येतो. अश्या या प्रचलित आख्यायिकांमुळे चंद्रभागा नदीला धार्मिक महत्व प्राप्त झाले आहे. पंढरपुरात येणार  प्रत्येक भक्त चंद्रभागा नदीची आंघोळ केल्याशिवाय माघारी फिरत नाही.

पंढरपुरातील चंद्रभागा नदीने रेल्वे पूल ते विष्णूपद या पाच किलोमीटर अंतरामध्ये तीन वेळा अर्धवर्तुळाकार घेतला आहे. नदीच्या या आकारामुळे लोकांनी तिला चंद्रभागा नाव दिल्याचे सांगितले जाते. या नदीबद्दल स्कंद पुराणातील माहात्मेयात ‘चंद्रभागा’ नावाचे सरोवर महाद्वारात मल्लिकार्जुन मंदिराजवळ (जे मंदिर विठ्ठल मंदिराचे आधीचे आहे.) होते, असे सांगितले जाते. तर, संत जनाबाई ‘भीमा आणि चंद्रभागा तुझ्या चरणीच्या गंगा’ असा दोन्ही नद्यांचा उल्लेख करतात. संतांच्या अभंगातूनही बऱ्याच वेळा भीमा भिवराकाठी देव असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. असे सांगितले जाते की, इ.स. 1850 सालच्या सुमारास चौफाळा भागात मुरलीधराचे मंदिर बांधताना पाया खणताना फार मोठा वाळूचा पट्टा तेथे सापडला होता. म्हणजे विठ्ठलाच्या पूर्वेस व पश्चिमेस दोन्हीकडे जलप्रवाह होते.

Photo credit: Vitthal Rukmini Mandir Samiti, Pandharpur