जेएनएन, नागपूर : महाराष्ट्रात गणेशोत्सवाच्या काळात ज्येष्ठ गौरी पूजनाला विशेष महत्त्व आहे. माहेरवाशिणी म्हणून घरी आलेल्या गौरींचे अडीच दिवस मोठ्या प्रेमाने आणि उत्साहाने आदरातिथ्य केले जाते. गौरींच्या आगमनापासून ते विसर्जनापर्यंत घरात विविध धार्मिक विधी, नैवेद्य, आरती आणि पारंपरिक खेळांचे आयोजन केले जाते. या संपूर्ण सोहळ्यात गौरींच्या स्वागतासाठी म्हटली जाणारी लोकगीते आणि ओव्या विशेष आकर्षण ठरतात.

गौरी पूजनाच्या दिवशी महिला एकत्र येऊन पारंपरिक लोकगीते म्हणतात. या गीतांमधून गौरीचे लक्ष्मीस्वरूप, घरातील सुख-समृद्धी, माहेरची ओढ, भाऊ-बहिणीचे नाते आणि कुटुंबाच्या मंगलमय भविष्यासाठीच्या भावना व्यक्त केल्या जातात. त्यामुळे गौरी पूजनाच्या परंपरेत या लोकगीतांना केवळ मनोरंजनाचे नव्हे, तर सांस्कृतिक आणि भावनिक महत्त्वही आहे.

‘आली आली लक्ष्मी’ म्हणत गौरीचे स्वागत

गौरीचे आगमन झाल्यानंतर तिचे लक्ष्मीस्वरूप मानून तिचे स्वागत केले जाते. यावेळी महिला पारंपरिक गीत म्हणत गौरीकडे घरात सुख-समृद्धी नांदण्याची प्रार्थना करतात.

‘आली आली लक्ष्मी, आली तशी जाऊ नको,
बाळाला सांगते, धरला हात सोडू नको.

मला आहे हौस, चांदीच्या ताटाची,
लक्ष्मीच्या नैवेद्याला मूठ साखरभाताची...’

    या गीतातून गौरीच्या रूपाने आलेली लक्ष्मी घरात कायम राहावी, अशी भावनिक इच्छा व्यक्त केली जाते. चांदीचे ताट, साखरभाताचा नैवेद्य यांसारख्या उल्लेखांतून गौरीच्या स्वागताची पारंपरिक पद्धतही दिसून येते.

    ‘गवराय आली’ म्हणत सांगितली जातात मंगल पावले

    **‘गवराय आली, गवराय आली, कोणत्या पावलानं?
    हळदी-कुंकवाच्या पावलानं, हिऱ्या-माणकाच्या पावलानं!

    सोन्या-चांदीच्या पावलानं, सुख-समृद्धीच्या पावलानं!
    गायी-वासरांच्या पावलानं, धन-धान्याच्या पावलानं!
    लेकी-सुनांच्या पावलानं, नातवंडांच्या पावलानं!
    अखंड सौभाग्याच्या पावलानं, आनंदाच्या पावलानं!’**

    गौरीने घरात सुख, समृद्धी, धन-धान्य, सौभाग्य आणि आनंद घेऊन यावे, अशी भावना या गीतातून व्यक्त होते.

    ‘रुणुझुणुत्या पाखरा’मधून माहेरची ओढ

    ‘रुणुझुणुत्या पाखरा,
    जा रे माझ्या माहेरा,
    आली गौराई अंगणी,
    तिला लिंबलोन करा...’

    ‘गवर गौरी ग, गौरी ग,
    झिम्मा फुगडी खेळू दे,

    हिरव्या रानात रानात,
    गवर माझी नाचू दे...’
    मी हो बहीन लाडकी 
    हेच पानाच्या तबकी 
    दिली कुर्हार्डीची ओवळणी 
    तोच भाऊ खरा 
    माया ममतेची ममतेची 
    आई मला भेटु दे 
    माहेरपनाच ,पणाच 
    रुनुझुनूत्या पाखरा

    गवर गौरी ग गौरी ग
    झिम्मा फुगड़ी खेळु

     दे कशी माहेरला येऊ
    शिवेवरी उभा भाऊ
    गेला उगड मातेची 
    ओटी भरून माघारा
    जीव लावुनी जीवाला
    टीळा लाविते रक्ताच
    आता म्होरल्या जन्मात
    नदी भेटु दे सागराला
    रुनुझुनूत्या पाखरा

    गौरी पूजनाच्या निमित्ताने म्हटली जाणारी ही लोकगीते महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचा महत्त्वाचा भाग आहेत. पिढ्यान्‌पिढ्या महिला या ओव्या आणि गीते पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवत आल्या आहेत. आधुनिक काळात गौरी पूजनाच्या पद्धतींमध्ये काही बदल झाले असले, तरी अनेक कुटुंबांमध्ये आजही गौरींच्या स्वागतावेळी पारंपरिक गीते म्हणण्याची प्रथा कायम आहे.