जेएनएन, मुंबई: पनीर म्हटलं की अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं. पनीर टिक्का, शाही पनीर, कढाई पनीर, मटर पनीर किंवा पनीर मसाला अशा पदार्थांची ऑर्डर हॉटेल,रेस्टॉरंटमध्ये मोठ्या आवडीने दिली जाते. मात्र, तुम्ही ज्या पदार्थाला ‘पनीर’ समजून खात आहात, ते खरोखर दुधापासून तयार केलेले पनीर आहे का, हा प्रश्न आता गंभीर बनला आहे. देशभरात ‘अॅनालॉग पनीर’ अर्थात नॉन-डेअरी पनीरच्या वापराबाबत अन्न सुरक्षा यंत्रणांकडून चिंता व्यक्त केली जात आहे.

महाराष्ट्रात या उत्पादनाच्या उत्पादन, साठवणूक, वितरण आणि विक्रीवर वर्षभराची बंदी घालण्यात आली आहे. हॉटेल, रेस्टॉरंट, केटरिंग आणि क्लाउड किचनमध्ये त्याचा वापर करण्यासही मनाई करण्यात आली आहे. आता FSSAIच्या पातळीवर अशा नॉन-स्टँडर्डाइज्ड डेअरी अॅनालॉग उत्पादनांवर देशभरात आणखी कठोर निर्बंध आणण्याबाबत चर्चा सुरू असल्याने पनीरप्रेमींच्या चिंतेत भर पडली आहे. 

नेमकं ‘अॅनालॉग पनीर’ म्हणजे काय?
अॅनालॉग पनीर दिसायला आणि पोताला खऱ्या पनीरसारखे असते. मात्र ते पूर्णपणे दुधापासून तयार झालेले नसते. उपलब्ध माहितीनुसार अशा उत्पादनांमध्ये वनस्पती तेल किंवा वनस्पती चरबी, स्टार्च, मिल्क सॉलिड्स, सोया किंवा वाटाणा प्रथिने, स्टॅबिलायझर्स, इमल्सिफायर्स आणि फ्लेवर्स यांसारख्या घटकांचा वापर केला जाऊ शकतो. त्यामुळे ते पारंपरिक दुधाच्या पनीरपेक्षा कमी खर्चात तयार होऊ शकते.

याच कमी उत्पादन खर्चामुळे मोठ्या प्रमाणावर पनीर वापरणाऱ्या व्यावसायिकांसाठी हा स्वस्त पर्याय ठरू शकतो. मात्र, ग्राहकाला याची माहिती न देता हे उत्पादन ‘पनीर’ म्हणून विकणे किंवा पनीरच्या पदार्थात वापरणे हा गंभीर नियामक प्रश्न आहे.

महाराष्ट्रात वर्षभराची बंदी का?
महाराष्ट्र FDAने एप्रिल 2025 ते मार्च 2026 या कालावधीत पनीर आणि डेअरी-अॅनालॉगचे एकूण 308 नमुने तपासले. त्यापैकी 109 नमुने म्हणजे 35.4 टक्के नमुने निर्धारित निकषांनुसार अपयशी ठरले. यामध्ये 79 नमुने ‘सब-स्टँडर्ड’ तर 30 नमुने ‘असुरक्षित’ घोषित करण्यात आले. काही नमुन्यांच्या चरबीच्या प्रयोगशाळा तपासणीत दूधातील चरबीच्या निर्धारित मर्यादांपेक्षा वेगळे निष्कर्ष आढळले, ज्यातून वनस्पती चरबीचा वापर किंवा दूधातील चरबीची जागा वनस्पती चरबीने घेतल्याचे संकेत मिळाले.

या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या अन्न व औषध प्रशासनाने 30 जुलै 2026 रोजीच्या आदेशानुसार अॅनालॉग किंवा नॉन-डेअरी पनीरच्या उत्पादन, साठवणूक, वितरण आणि विक्रीवर एक वर्षासाठी बंदी घातली. हॉटेल, रेस्टॉरंट, केटरर आणि क्लाउड किचननाही त्याचा वापर बंद करण्याचे निर्देश देण्यात आले.

    फक्त दुकानांवर नाही, हॉटेलच्या मेनूवरही नजर
    या प्रकरणातील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे ग्राहकांची होणारी दिशाभूल आहे. एखाद्या हॉटेलच्या मेनूमध्ये ‘पनीर’ असा उल्लेख असेल आणि प्रत्यक्षात त्या पदार्थात नॉन-डेअरी अॅनालॉग वापरले जात असेल, तर ग्राहकाला तो खरा पनीर असल्याचे वाटू शकते.यापूर्वीच FSSAIच्या पश्चिम विभागाने एप्रिल 2026 मध्ये स्पष्ट केले होते की, चीज अॅनालॉगला ‘पनीर’ म्हणून विकणे कायद्याचे गंभीर उल्लंघन आहे. हॉटेल आणि फूड सर्व्हिस आस्थापनांनी कच्च्या मालाची तपासणी करावी, खरेदीच्या नोंदी ठेवाव्यात आणि अॅनालॉग वापरला असल्यास त्याची ग्राहकांना स्पष्ट माहिती द्यावी, असे निर्देश देण्यात आले होते.

    आता देशभरात काय होणार?
    FSSAIच्या संबंधित समितीच्या चर्चेत नॉन-स्टँडर्डाइज्ड डेअरी अॅनालॉग उत्पादनांबाबत कठोर भूमिका घेण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे. ‘अॅनालॉग पनीर’सारख्या उत्पादनांना स्वतंत्र नाव आणि स्पष्ट ओळख असावी, तसेच ग्राहकांची दिशाभूल होणार नाही यासाठी त्यांच्यावर कठोर निर्बंध असावेत, अशी भूमिका चर्चेत पुढे आली आहे. समितीच्या चर्चेत अशा उत्पादनांना मान्यता देण्याऐवजी मानके निश्चित असलेल्या उत्पादनांनाच परवानगी देण्याचा विचारही मांडण्यात आला.त्यामुळे सध्या ‘देशभरात अॅनालॉग पनीरवर अंतिम बंदी लागू झाली’ असे म्हणणे योग्य ठरणार नाही. मात्र, FSSAIच्या पातळीवर देशव्यापी कठोर कारवाईची शक्यता वाढली आहे.

    हेही वाचा: Maharashtra Weather: महाराष्ट्रात सप्टेंबरच्या सुरुवातीला पुन्हा जोर वाढण्याची शक्यता, विदर्भाला आज पावसाचा इशारा