जेएनएन, नागपूर : महाराष्ट्राच्या ग्रामीण संस्कृतीत बैलपोळा हा केवळ सण नसून शेतकऱ्याच्या जीवनात महत्त्वाचे स्थान असलेल्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलांना पोळ्याच्या दिवशी सजवून त्यांची पूजा केली जाते. मात्र, पोळ्याच्या आधल्या दिवशीही बैलांसाठी एक महत्त्वाची पारंपरिक प्रथा केली जाते. या प्रथेला ‘खांदे मळणी’ किंवा ‘खांदे शेकणे’ असे म्हटले जाते.
बैलांची ‘खांदे मळणी’ म्हणजे काय?
पोळ्याच्या आदल्या दिवशी बैलांच्या खांद्यावर हलक्या हाताने तेल लावून त्यांची मालिश केली जाते. काही भागांत गरम पाण्याची शेक दिली जाते, तर काही ठिकाणी पारंपरिक पद्धतीने खांदे चोळून त्यांना आराम दिला जातो. वर्षभर नांगरणी, पेरणी, मळणी आणि शेतीची विविध कामे करताना बैलांच्या खांद्यावर मोठा ताण येतो. त्यामुळे पोळ्याच्या आधी त्यांच्या शरीराला आराम देण्यासाठी ही प्रथा केली जाते.
खांदे मळणी करताना बैलांच्या खांद्याचा आणि मानेचा भाग विशेषतः चोळला जातो. यामुळे दिवसभराच्या श्रमामुळे आलेला थकवा कमी करण्याचा प्रयत्न केला जातो. ही प्रथा शेतकरी आणि बैल यांच्यातील जिव्हाळ्याचे नाते दर्शवते.
बैलांना जेवणाचे निमंत्रण
खांदे मळणीसोबतच पोळ्याच्या आदल्या दिवशी बैलांना जेवणाचे निमंत्रण देण्याचीही परंपरा अनेक ग्रामीण भागांत आढळते. शेतकरी आपल्या बैलांना घरातील सदस्यांप्रमाणे मान देत त्यांना प्रेमाने घरी आणतो. त्यांच्यासाठी खास खाद्यपदार्थ तयार केले जातात. यावेळी " आज आवताण घ्या, उद्या जेवायला या" असे म्हणण्याची पद्धत देखील आजही मोठ्या उत्साहात साजरी केली जाते.
या निमंत्रणामागे केवळ धार्मिक भावना नसून वर्षभर शेतीच्या कामात साथ देणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची भावना आहे. पोळ्याच्या दिवशी त्यांची पूजा करण्यापूर्वी त्यांना विश्रांती आणि प्रेम देणे, हा या परंपरेचा महत्त्वाचा भाग मानला जातो.

पोळ्यापूर्वी बैलांना विश्रांती
बैलपोळ्याच्या दिवशी बैलांना शेतीच्या कामापासून पूर्ण विश्रांती दिली जाते. त्यांना आंघोळ घालून स्वच्छ केले जाते. शिंगांना रंग लावला जातो, अंगावर झुली चढवली जाते आणि विविध प्रकारे सजवले जाते. त्यानंतर त्यांची पूजा करून नैवेद्य दाखवला जातो.
या संपूर्ण परंपरेत बैलांना केवळ शेतीचे साधन न मानता कुटुंबातील एक महत्त्वाचा घटक आणि शेतकऱ्याचा विश्वासू साथीदार म्हणून सन्मान दिला जातो.
हेही वाचा: Bail Pola Poems: ‘बैला, खरा तुझा सण...’; बैल पोळ्यानिमित्त वाचा बहिणाबाई आणि कवी यशवंतांच्या हृदयस्पर्शी कविता
हेही वाचा:Bail Pola 2026: सर्जा-राजासाठी पुरणपोळीचा नैवेद्य का? जाणून घ्या बैल पोळ्याच्या खास परंपरेमागचं कारण
