जेएनएन, नागपूर: महाराष्ट्राच्या ग्रामीण संस्कृतीत शेतकरी आणि बैल यांचे नाते अत्यंत जिव्हाळ्याचे आहे. वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरा केला जाणारा बैल पोळा हा शेतकरी बांधवांसाठी विशेष महत्त्वाचा सण आहे. अनेक वर्षांपासून महाराष्ट्राच्या विविध भागांत हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. बैलांची सजावट, पूजा, मिरवणूक आणि पुरणपोळीचा नैवेद्य अशा विविध परंपरांमुळे पोळ्याला ग्रामीण जीवनात विशेष स्थान मिळाले आहे.

बैल पोळ्याचे महत्त्व केवळ धार्मिक किंवा सांस्कृतिक परंपरेपुरते मर्यादित नाही. या सणातून शेतकऱ्याच्या जीवनात बैलाचे असलेले स्थान, त्याच्यावर असलेली माया आणि वर्षभराच्या कष्टांबद्दलची कृतज्ञता व्यक्त होते. त्यामुळेच बैल पोळ्याची छाप मराठी लोकजीवनाबरोबरच साहित्य आणि कवितांवरही पडलेली दिसते.


आला आला शेतकऱ्या, पोयाचा रे सन मोठा,
हातीं घेईसन वाट्या,  आतां शेंदूराले घोटा,
आतां बांधा रे तोरनं,  सजवा रे घरदार,
करा आंघोयी बैलाच्या  लावा शिंगाले शेंदुर,
लावा शेंदूर शिंगाले, शेंव्या घुंगराच्या लावा,
गयामधीं बांधा जीला, घंट्या घुंगरू मिरवा,
बांधा कवड्याचा गेठा,  आंगावऱ्हे झूल छान,
माथां रेसमाचे गोंडे,  चारी पायांत पैंजन,
उठा उठा बह्यनाई,  चुल्हे पेटवा पेटवा,
आज बैलाले नीवद,  पुरनाच्या पोया ठेवा,
वढे नागर वखर, नहीं कष्टाले गनती,
पीक शेतकऱ्या हातीं, याच्या जीवावर शेतीं,
उभे कामाचे ढिगारे, बैल कामदार बंदा,
याले कहीनाथे झूल, दानचाऱ्याचाज मिंधा,
चुल्हा पेटवा पेटवा, उठा उठा आयाबाया,
आज बैलाले खुराक, रांधा पुरनाच्या पोया,
खाऊं द्या रे पोटभरी, होऊं द्यारे मगदूल,
बशीसनी यायभरी, आज करूं या बागूल,
आतां ऐक मनांतलं, माझं येळीचं सांगन,
आज पोयाच्या सनाले, माझं येवढं मांगन,
कसे बैल कुदाळता, आदाबादीची आवड,
वझं शिंगाले बांधतां, बाशिंगाचं डोईजड,
नका हेंडालूं बैलाले, माझं ऐका रे जरासं,
व्हते आपली हाऊस, आन बैलाले तरास,
आज पुंज रे बैलाले, फेडा उपकाराचं देनं,
बैला, खरा तुझा सन, शेतकऱ्या तुझं रीन !

– बहिणाबाई चौधरी




शिंगे रंगविली, बाशिंगे बांधली

चढविल्या झुली, ऐनेदार

राजा परधान्या, रतन, दिवाण

    वजीर, पठाण, तुस्त मस्त

    वाजंत्री वाजती, लेझिम खेळती

    मिरवीत नेती, बैलांलागी

    डुल-डुलतात, कुणाची वशिंडे

    काही बांड खोंडे, अवखळ

    कुणाच्या शिंगाना, बांधियले गोंडे

    हिरवे तांबडे, शोभिवंत

    वाजती गळ्यांत, घुंगरांच्या माळा

    सण बैलपोळा, ऐसा चाले

    झुलींच्या खालती, काय नसतील

    आसूडांचे वळ, उठलेले ?

    आणि फुटतील, उद्याही कडाड

    ऐसेच आसूड, पाठीवर

    जरी मिरविती, परि धन्याहाती

    वेसणी असती, घट्ट पाहा

    जरी झटकली जराशीहि मान

    तरी हे वेसण खेचतील

    सण एक दिन, बाकी वर्षभर

    ओझे मरमर, ओढायाचे !

    — यशवंत





    रात दिन करी कष्ट

    ओल्या मातीच्या रानात

    तेल हळद लाऊन

    खांदे मळण दारात ।।

    बैल राबतो शेतात

    धान्य देई पिकवून

    सुखी होई घर सारे

    मग खातात बसून ।।

    घाली आंघोळ जोडीला

    पोळा येतो आनंदाचा

    देते ओवाळून राणी

    घास पुरण पोळीचा ।।

    बैल सजून धजून

    बांधे येशीला तोरण

    झूल घाली अंगावर
    आने गावात फिरून। ।।

    गाव येशीतून चाले

    साऱ्या बैलाचा तो पोळा

    नवे कपडे घालून

    सारे जन होती गोळा ।।

    पाय धुऊन बैलाचे

    कुंकू लावते कपाळी

    पुजा आरच्या करून

    घाली पुरणाची पोळी ।।