जेएनएन, मुंबई. Raj-Uddhav thackeray Meet at Matoshree : मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आल्यानतर राज ठाकरे व उद्धव ठाकरे यांनी 5 जुलै रोजी तब्बल 20 वर्षानंतर एकाच व्यासपीठावर येत वरळी डोम येथे विजयी मेळावा घेतला होता. त्यानंतर राजकारण ढवळून निघाले. आगामी महापालिका निवडणुकीसाठी दोन ठाकरे बंधू एकत्र येणार का? याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या असतानाच रविवारी (27 जुलै) उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) वाढदिवसांच्या निमित्ताने राज ठाकरे (Raj thackeray) यांनी 13 वर्षानंतर मातोश्रीवर पाऊल ठेवले. दोन ठाकरे बंधूंची भेट ऐतिहासिक भेट होती. या भेटीत मातोश्रीवर नेमकं काय-काय घडलं याचा वृत्तांत सामनामधून देण्यात आला आहे.
सामनामध्ये लिहिले आहे की, उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त मुंबई–महाराष्ट्रासह देशभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असतानाच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही ‘मातोश्री’ निवासस्थानी येऊन उद्धव ठाकरे यांचे अभीष्टचिंतन केले. दोन्ही बंधूंची गळाभेट झाली. दोघेही ‘मातोश्री’मधील हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या खोलीत जाऊन साहेबांच्या आसनासमोर नतमस्तक झाले. राज ठाकरे यांच्या भेटीने आणि शुभेच्छांनी आनंद द्विगुणित झाला, अशा भावना उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केल्या. संपूर्ण महाराष्ट्रही ठाकरे बंधूंच्या या भेटीने पुन्हा एकदा आनंदला. बंधूभेटीचा हा सुवर्णक्षण हजारो मोबाईल आणि कॅमेऱ्यांमध्ये शेकडो वेळा क्लिक झाला.
पुढे म्हटले आहे की, राज ठाकरे यांनी गुलाबांचा बुके देऊन उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर दोघांचीही गळाभेट झाली. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या खोलीत जाऊन त्यांच्या आसनासमोर दोघेही नतमस्तक झाले. यावेळी जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. शिवसेनाप्रमुखांच्या व्यंगचित्रांवरही चर्चा झाली. जवळपास 20 मिनिटे राज ठाकरे ‘मातोश्री’ निवासस्थानी होते. यावेळी दोन्ही बंधूंमध्ये दिलखुलास गप्पा रंगल्या. नंतर निघतानाही उद्धव ठाकरे राज यांना सोडायला बाहेर आले. सगळय़ांना हात उंचावून नमस्कार करत राज परतले.