नवी दिल्ली: WB Assembly Results 2026: पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम आणि पुदुचेरी येथे झालेल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल आज जाहीर होणार आहेत. त्यामुळे, या राज्यांमध्ये कोणत्या पक्षाला जनतेचा कौल मिळेल आणि कोणाचा पराभव होईल याची उत्कंठा लागली आहे. देशात सर्वात अधिक उत्सुकता कोणत्या राज्याच्या विधानसभा निवडणूक निकालाची असेल तर ती म्हणजे पश्चिम बंगालच्या (WB Election Results 2026). बंगालसोबतच आज तमिळनाडू, केरळ, आसाम आणि पुद्दुचेरी विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर होणार आहे.
पश्चिम बंगाल वगळता अन्य सगळ्या राज्यांमध्ये एक टप्प्यात मतदान झालं आहे. बंगालमध्ये २९ एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्याचं मतदान झालं. त्यानंतर विविध संस्थांचे एक्झिट पोल्स समोर आले आहेत. त्यानुसार अनेक एक्झिट पोल्सनी पश्चिम बंगालमध्ये सत्तांतर होण्याचा अंदाज वर्तवला आहे.
निवडणुकीचे निकाल आज जाहीर होत असले तरी एक्झिट पोलच्या आकडेवारीने भाजप गोटात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. भाजपला बंगालमध्ये पूर्ण बहुमत मिळण्याचा अंदाज आहे. दुसरीकडे टीएमसी प्रमुख आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मात्र या एक्झिट पोलची आकडेवारी फेटाळून लावत मां, माटी आणि मानुषचे पुन्हा सरकार स्थापन होईल, असा दावा केला आहे.
पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. यावेळी ममता बॅनर्जी विजयाचा चौकार मारणार की भाजप सत्ता हिसकावून घेणार, याची उत्सुकता आहे. बंगालमध्ये विधानसभेच्या २९४ जागा आहेत. तृणमूल काँग्रेसनं गेल्या निवडणुकीत २१५ जागा जिंकत दणदणीत विजय मिळवला. तर भाजपनं ७७ जागा मिळवल्या होत्या. भाजपनं ३ वरुन थेट ७७ वर झेप घेतली. यंदा पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यापासून भाजपच्या जवळपास सगळ्या मुख्यमंत्र्यांनी बंगालमध्ये जोरदार प्रचार केला होता. त्याचा फायदा भाजपला होईल, असं एक्झिट पोलचे आकडे सांगतात. राज्यात निवडणुकीपूर्वी झालेल्या SIRचा लाभ भाजपला मिळणार का, याचाही आज फैसला होणार आहे.
Assembly Election Results 2026: Exit Poll नुसार पश्चिम बंगालमध्ये कोणाला बहुमत?
- 294 जागांच्या पश्चिम बंगाल विधानसभेमध्ये बहुमतासाठी 147 जागांची गरज आहे.
- पी-मार्क एक्झिट पोलमध्ये टीएमसीला 118–138, तर भाजपाला 150–175 जागा दिल्या आहेत.
- मॅटराइज एक्झिट पोलमध्ये टीएमसीला 125–140, भाजपाला 146–161 आणि इतरांना 6–10 जागा दिल्या आहेत.
