नवी दिल्ली - उत्तरप्रदेशमधील जाफरगंज पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या एका गावात, रविवारी वराची गाडी चालवणाऱ्या मद्यधुंद चालकाला वऱ्हाडी मंडळींनी चांगलाच चोप दिला. रागाच्या भरात, चालकाने वधूला गाडीत बसवले आणि निरोपाच्या वेळी वेगाने गाडी पळवून नेली.

घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याने गाडी त्यांच्या अंगावर घालवण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे गोंधळ उडाला. याला प्रत्युत्तर म्हणून वधूकडील  तरुणांनी दुचाकीवरून कार चालकाचा पाठलाग केला आणि त्याला एक किलोमीटर अंतरावर पकडले. माहिती मिळताच पोलीस पोहोचले आणि दोन्ही पक्षांना पोलिस ठाण्यात घेऊन गेले. तथापि, दोन्ही पक्षांमध्ये समेट झाला आहे.

रविवारी, बिंदकी पोलिस स्टेशनच्या हद्दीतील एका गावातून जाफरगंज पोलिस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या एका गावात लग्नाची वरात आली. वराच्या बाजूने शेजारच्या गावातील एक कार भाड्याने घेतली होती. स्वागत समारंभात वराच्या गाडीचा चालक दारूच्या नशेत तर्र होता. लग्न समारंभासाठी चालक वराला घेऊन आला तेव्हा त्याची वागणूक विचित्र होती.

यावेळी, लोकांनी ड्रायव्हरला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आणि त्याला मारहाण करत पुन्हा असे वर्तन न करण्याची ताकीद दिली. सोमवारी, निरोपाच्या वेळी, ड्रायव्हर पुन्हा मद्यधुंद झाला. लग्नाच्या विदाईवेळी लोकांनी त्याला कार घेऊन येण्यास सांगितल्यावर तो त्यांच्याशी भांडू लागला. परिस्थिती चिघळल्यानंतर लोकांनी हस्तक्षेप करून त्याला शांत केले.

यानंतर, वधूला निरोप देण्यासाठी गाडीत बसवण्यात आले. दरम्यान, चालकाने संधी साधून वधू आणि गाडी घेऊन पळ काढला. उपस्थित लोकांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याने त्यांच्यावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला. 

    यानंतर वधुकडील मंडळींनी दुचाकीवरून गाडीचा पाठलाग केला आणि सुमारे एक किलोमीटर अंतरावर गाडी थांबवली. त्यानंतर जमावाने चालकाला मारहाण करत वधूला सोडवले. माहिती मिळताच पोलीस आले आणि दोन्ही पक्षांना पोलिस ठाण्यात आणले. स्टेशन प्रभारी धनंजय सरोज यांनी सांगितले की, वधुकडील मंडळींनी कार चालकावर हल्ला केला होता. आता प्रकरण मिटवण्यात आले आहे.