सूरत. सूरतमध्ये एका कपडा व्‍यापाऱ्याकडे अकाऊटंट पदावर काम करणाऱ्या तरुणाने 10 हजार रुपये थकीत वेतन न मिळाल्यामुळे त्याने कपडा व्यापाऱ्याचा 24 कोटी रुपयांचा माल पेट्रोल टाकून जाळला. या घटनेनंतर आरोपी राजस्‍थान, महाराष्‍ट्र व उत्तर प्रदेशला पळून गेला. मात्र तेथून सूरतला परत आल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. 

तरुणाने 10 हजार थकीत पगारासाठी लावली आग -

सूरत बारडोली रोडवर असलेला कपडा बाजार श्‍याम संगिनीच्या सहाव्या मजल्यावर जगदंबा टेक्‍सटाइल नावाच्या दुकानात विनोद सावळे नावाचा तरुण अकाउंटेंट पदावर काम करत होता. त्याचे वेतन महिना 30 हजार रुपये होते. तो बारावीपर्यंत शिकलेला असल्याने तो काम व्यवस्थित करू शकत नव्हता. त्यामुळे त्याला जून महिन्यात कामावरून काढून टाकले होते.

पगारातील थकीत 10 हजार रुपयांवरून त्याचा व्‍यापाऱ्यासोबत वाद सुरू होता. अनेकदा मागणी करूनही पगार मिळत नसल्याने रागाच्या भरात त्याने गेल्या आठवड्यात बाजार बंद झाल्यानंतर सहाव्या मजल्यावर ठेवलेल्या कपड्यांच्या साठ्यावर पेट्रोल शिंपडून आग लावली. त्याचे कृत्य सीसीटीव्हीत कैद झाले. 

सूरतमध्ये 24 कोटींचे कापड जळून खाक -

या अग्निकांडात जवळपास 24 कोटी रुपयांचे कापड जळून खाक झाले आहे. पोलिसांनी सांगितले की, आग लागल्यानंतर अरोपी विनोद राजस्‍थानमधील खाटू श्‍यामजी, उत्‍तर प्रदेशातील अयोध्‍या आणि त्यानंतर महाराष्‍ट्रात गेला. दोन दिवसापूर्वी तो सूरतला परतला. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे त्याची ओळख पटवून त्याला अटक केली.