जेएनएन, मुंबई. शिवसेना पक्ष आणि पक्षाच्या धनुष्यबाण पक्षचिन्हावर गेल्या तीन वर्षांपासून कायदेशीर लढाई सुरू आहे. ही लढाई आता निर्णायक टप्प्यावर पोहोचली आहे. सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) आज या प्रकरणावर सुनावणी होणार होती. मात्र पुन्हा न्यायालयाने ही सुनावणी पुढे ढकलली आहे.
पुढील सुनावणी 12 नोव्हेंबर रोजी
शिवसेना पक्षाचे (Shiv Sena) चिन्ह आणि त्यावरील वादग्रस्त प्रकरणाची पुढील सुनावणी आता 12 नोव्हेंबर रोजी होणार आहे. यापूर्वी, जानेवारीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नियोजित असल्याने, ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी हे प्रकरण लवकर ऐकण्याची विनंती केली होती. युक्तिवादासाठी किमान 45 मिनिटांचा वेळ आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले होते.
याकडे सर्वांचे लक्ष
या प्रकरणाची सुनावणी एक महिन्याने पुढे ढकलण्यात आली आहे. 12 नोव्हेंबरपर्यंत सुनावणी पुढे गेल्याने, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी या प्रकरणाचा निकाल येण्याची संभाव्यता खूप कमी दिसत आहे, असं जाणकार सांगत आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गट यांच्यातील शिवसेनेच्या चिन्हावरून सुरू असलेल्या या कायदेशीर लढाईत, सुनावणीतील हा विलंब महाराष्ट्राच्या राजकारणावर, विशेषतः आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका 2025 (BMC Election) वर कसा परिणाम करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शिवसेना पक्षात उभी फूट
बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेना पक्षात उभी फूट पडल्यानंतर निवडणूक आयोगाने निर्णय देताना शिवसेना पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदे यांना दिले होते. त्यावर सुप्रिम कोर्टात वाद सुरु आहे. यावर आता अंतिम सुनावणी होणार आहे.
धनुष्यबाण चिन्ह कोणाला मिळणार?
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील काही महिन्यात पार पडतील. त्याआधीच खरी शिवसेना कुणाची हा निकाल सुप्रीम कोर्ट देणार आहे. त्यामुळे धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे यांच्याकडे कायम राहणार की ते पुन्हा उद्धव ठाकरे यांना मिळणार हे सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर स्पष्ट होणार आहे.