जेएनएन, नवी दिल्ली. Radhika Yadav Murder Case : हरयाणामधील राष्ट्रीय टेनिस खेळाडू राधिका यादव (Radhika Yadav) या २५ वर्षीय तरुणीची तिच्या वडिलांनी गोळ्या घालून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली होती. गुरुग्राम येथील तिच्या राहत्या घरात ही घटना घडली. राधिकाचे वडील दीपक यादव यांनी तिच्यावर तीन गोळ्या झाडल्याचा आरोप असून याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे. गुरूवारी सकाळी गुरुग्राममधील सेक्टर ५७ येथे सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
गुरुग्राममध्ये राष्ट्रीय टेनिस खेळाडू राधिका यादव हिची तिच्या वडिलांनी गोळ्या घालून हत्या केली. याप्रकरणी आरोपी वडिलांना अटक करण्यात आली आहे. दिपक यांनी राधिकाला यामुळे गोळ्या घातल्या कारण मुलीची कमाई खात असल्याचे टोमणे लोक मारत होते. त्याचबरोबर तो राधिकावर टेनिस अकादमी बंद करण्याचा दबाव टाकत होता. घटनेवेळी राधिका स्वंयपाकघरात जेवण बनवत होती.या प्रकरणात राधिकाच्या वडिलांचा तिच्या प्रेम संबंधांना विरोध किंवा इन्स्टाग्रामवरील सोशल मीडिया रील असा दुसरा काही अँगल आहे का याचा देखील शोध घेतला जात आहे.
दंगल चित्रपटातील एक प्रसिद्ध डायलॉग तुम्ही ऐकलाच असेल की, 'म्हारी छोरियां छोरों से कम हैं के' (माझ्या मुली मुलाहून कमी आहेत का). हा डायलॉग हरयाणाची मुलगी नॅशनल टेनिस खेळाडू राधिका यादवने खरा ठरवला. राधिका यादवने आतापर्यंत १८ गोल्ड मेडल जिंकले आहेत, मात्र तिला कल्पनाही नसेल की, तिचे वडील तिचे स्वप्न चक्काचूर करतील. गुरुवार (10 जुलै) राधिका घरात जेवण बनवत असताना वडिलांनी तिच्यावर पाठीमागून गोळ्या झाडल्या. सांगितले जात आहे की, घटनेवेळी राधिकाची आई घरातच होती. जाणून घेऊया पोटच्या मुलीला संपवण्याचा धक्कादायक निर्णय वडिलांनी का घेतला?
आरोपी वडिलांना अटक -
मुलीच्या हत्या प्रकरणात सेक्टर-56 पोलिसांनी आरोपी वडील दिपक यादव यांना घरातून अटक केली असून त्यांच्याकडून हत्येसाठी वापरण्यात आलेली पिस्तुल जप्त करण्यात आली आहे.
मुलीची हत्या का केली?
आरोपी दिपक यादव यांनी आपल्या राष्ट्रीय स्तरावरील टेनिस खेळाडू मुलीची हत्या केवळ या कारणामुळे केली की, लोक त्यांना मुलीची कमाई खात असल्याचे टोमणे मारत होते. खोट्या प्रतिष्ठेपायी त्याने गुरुवारी दुपारी तीन गोळ्या घालून मुलीची हत्या केली. घटनेवेळी राधिका घरात जेवण बनवत होती.
लोकांच्या टोमण्यांनी त्रस्त होता दिपक -
मुलीच्या कमाईवर जगत असल्याच्या लोकांच्या टोमण्यांनी चिढलेल्या दिपकने राधिका चालवत असलेली टेनिस अकादमी बंद करण्यास सांगितले होते. मात्र राधिकाला हे मंजूर नव्हते. 15 दिवसापासून दोघांमध्ये यावरून वाद सुरू होता. गुरुवारी याच वादातून दिपकने मुलीवर गोळ्या झाडून तिला संपवले. सांगितले जात आहे की, दिपक रागीट स्वभावाचा आहे व त्याला कोणत्याही गोष्टीवरून लगेच राग येतो.
घटनेवेळी कुटूंबातील सदस्य कोठे होते?
सांगितले जात आहे की, घटनेवेळी घरात राधिकाचा भाऊ व आई होते तसेच खालच्या मजल्यावर काका कुलदीप यांचे कुटूंब होते. राधिकाला जखमी अवस्थेत मेरिंगो आशिया रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचारादरम्यान दुपारच्या सुमारास तिचा मृत्यू झाला. रुग्णालय प्रशासनाने याची माहिती पोलिसांना दिली. आरोपी वडिलांनी सांगितले की, मला माझ्या मुलीचा अभिमान होता मात्र लोकांचे टोमणे मनाला लागत होते.
पोलिसांनी काय सांगितले ?
पोलिसांनी सांगितले की, राधिका नॅशनल लेव्हलची खेळाडू होती. तिने अनेक पदके जिंकली होती. मात्र गेल्या काही महिन्यापासून खांद्याला दुखापत झाल्याने तिने खेळणे बंद केले होते. खेळ बंद केल्यानंतर राधिकाने वजीराबाद गावात मुलांना शिकवण्यासाठी अकादमी सुरू केली होती. मात्र वडील दिपक यांचा याला विरोध होता.
राधिकाने वडिलांना समजावण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला मात्र त्यांचे म्हणणे होते की, गावात फिरताना लोक म्हणतात की, तो मुलीची कमाई खात आहे. यामुळे मनाला प्रचंड यातना होतात. यावरून जवळपास 15 दिवसापासून बाप लेकीमध्ये वाद सुरू होता. यातूनच वडिलांनी मुलीची हत्या करून तिला संपवलं.