एजन्सी, नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रविवारी होणाऱ्या बंगळूर दौऱ्यापूर्वी एक मोठी सुरक्षा त्रुटी उघडकीस आली आहे. त्यांच्या मुख्य कार्यक्रमाच्या ठिकाणी दोन जिलेटीनच्या काड्या आढळून आल्या.

बंगळूरुच्या सेंट्रल रेंजच्या डीआयजींनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधानांच्या आगमनाच्या ठिकाणापासून सुमारे 3 किलोमीटर अंतरावर रविवारी सकाळी सुरक्षा तपासणीदरम्यान ही स्फोटके सापडली.

फुटपाथवर सापडलेल्या काठ्या

अधिकाऱ्याने सांगितले, "तपासादरम्यान फूटपाथच्या कडेला जिलेटीनच्या दोन काड्या आढळून आल्या. हे ठिकाण मुख्य कार्यक्रमाच्या स्थळापासून सुमारे 3 किलोमीटर अंतरावर आहे, जिथे पंतप्रधान मोदी पोहोचणार होते. पुढील तपास सुरू आहे." 

गुप्तचर यंत्रणांना दहशतवादी हल्ल्याबाबत मिळाली होती माहिती 

गुप्तचर यंत्रणांनी दिल्लीत हाय अलर्ट जारी केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ही घटना घडली. संभाव्य दहशतवादी धोक्याची माहिती मिळाल्यानंतर, दिल्ली पोलीस आणि इतर सुरक्षा यंत्रणांनी अनेक संवेदनशील ठिकाणी पाळत वाढवली होती. 

    "संवेदनशील भागांमधील कोणत्याही संशयास्पद हालचाली, बेवारस वस्तू आणि पार्क केलेल्या वाहनांवर बारकाईने लक्ष ठेवण्याचे निर्देश पोलिसांना देण्यात आले आहेत," असे एका अधिकाऱ्याने सांगितले.