मुंबई. भारताच्या दुग्धव्यवसाय क्षेत्रासाठी अभिमानास्पद कामगिरी समोर आली आहे. राष्ट्रीय दुग्धविकास मंडळ (एनडीडीबी) आणि त्याची पूर्ण मालकीची उपकंपनी एनडीडीबी डेअरी सर्व्हिसेस (एनडीएस) यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर तीन प्रतिष्ठित पुरस्कार पटकावले आहेत. न्यूझीलंडमधील ऑकलंड येथे 17 नोव्हेंबर 2026 रोजी आयोजित इंटरनॅशनल डेअरी फेडरेशन (आयडीएफ) डेअरी इनोव्हेशन अवॉर्ड्स 2026 मध्ये भारताच्या तीन उपक्रमांना गौरविण्यात आले. विशेष म्हणजे, या पुरस्कारांमधून महिला नेतृत्वाखालील आणि शेतकरी मालकीच्या दुग्ध सहकारी संस्थांच्या कामगिरीची जागतिक स्तरावर दखल घेण्यात आली आहे.
भारत सरकारच्या पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभागाचे सचिव नरेश पाल गंगवार यांच्या उपस्थितीत एनडीडीबीचे अध्यक्ष डॉ. मीनेश शाह यांनी हे पुरस्कार स्वीकारले. या यशाबद्दल बोलताना त्यांनी हा एनडीडीबी आणि भारतातील दुग्ध सहकारी संस्थांसाठी अभिमानाचा क्षण असल्याचे सांगितले. महिला सक्षमीकरण, ग्रामीण अर्थव्यवस्थेचे बळकटीकरण आणि दुग्धव्यवसायातील सहकार चळवळीचा विस्तार या उद्दिष्टांना या पुरस्कारांमुळे जागतिक मान्यता मिळाली आहे, असे त्यांनी नमूद केले.
मणिपूरमधील दुग्ध सहकारी संस्थांच्या पुनरुज्जीवनाचा गौरव
एनडीडीबीला मणिपूरमधील दुग्धव्यवसायाच्या विकासासाठी राबविण्यात आलेल्या ‘मणिपूर डेअरी इन इंडिया : बिल्डिंग ब्रिजेस थ्रू विमेन-सेंट्रिक कोऑपरेटिव्हज फॉर सस्टेनेबल लाइव्हलीहुड्स डेव्हलपमेंट’ या उपक्रमासाठी पुरस्कार मिळाला. शेती आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेतील सामाजिक-आर्थिक शाश्वततेसाठी नवकल्पना या श्रेणीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या पुरस्कारासाठी 23 देशांतून 182 प्रवेशिका प्राप्त झाल्या होत्या. त्यातून मणिपूरमधील या उपक्रमाची निवड करण्यात आली. या प्रकल्पाच्या माध्यमातून महिलांना दुग्धव्यवसायात सक्षम बनविणे, ग्रामीण कुटुंबांचे उत्पन्न वाढविणे आणि विविध समुदायांमध्ये सहकार्याची भावना निर्माण करणे यावर भर देण्यात आला आहे.
मणिपूरमधील दुग्धव्यवसायाला नव्याने उभारी देण्यासाठी एनडीडीबीकडून व्यावसायिक व्यवस्थापनाची अंमलबजावणी केली जात आहे. सहकारी संस्थांचे सक्षमीकरण, पशुधनाची उत्पादकता वाढविणे, दूध संकलनासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि बाजारपेठेपर्यंत पोहोच वाढविणे अशा विविध उपाययोजनांद्वारे हा व्यवसाय अधिक सक्षम करण्याचा प्रयत्न सुरू आहे. या माध्यमातून महिलांना रोजगार आणि उत्पन्नाच्या संधी उपलब्ध होत असून ग्रामीण भागातील उपजीविकेची साधने अधिक शाश्वत करण्यास मदत होत आहे.
महिला नेतृत्वाच्या दुग्धव्यवसाय मॉडेलला दोन पुरस्कार
एनडीडीबीची पूर्ण मालकीची उपकंपनी असलेल्या एनडीडीबी डेअरी सर्व्हिसेस (एनडीएस) हिलाही तिच्या ‘वुमेन ओन. वुमेन लीड. वुमेन प्रॉस्पर : फ्रॉम ऑब्लिवियन टू रिकग्निशन’ या उपक्रमासाठी दोन पुरस्कार मिळाले आहेत.
ग्रामीण महिलांना केवळ दूध उत्पादक म्हणून मर्यादित न ठेवता त्यांना संस्थेच्या भागधारक, उद्योजक आणि नेतृत्वकर्त्या बनविण्याच्या उद्देशाने हे मॉडेल विकसित करण्यात आले आहे. महिला नेतृत्वाखालील दुग्ध उत्पादक संघटना (एमपीओ) हे या उपक्रमाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. या माध्यमातून महिलांना दुग्धव्यवसायाच्या निर्णयप्रक्रियेत सहभागी होण्याची आणि आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्याची संधी मिळते.
या उपक्रमाला ‘जजेस चॉइस अवॉर्ड’ही प्रदान करण्यात आला. आयडीएफने यंदा प्रथमच सुरू केलेल्या या विशेष पुरस्कारासाठी तज्ज्ञ परीक्षक मंडळाने या मॉडेलचे दूरदृष्टीपूर्ण उद्दिष्ट, प्रत्यक्ष परिणाम, विस्तारक्षमता आणि दुग्धव्यवसाय क्षेत्रात सकारात्मक बदल घडविण्याची क्षमता या निकषांवर निवड केली.
याशिवाय, ‘पीपल अँड प्लॅनेट इन द डेअरी सेक्टर : इनोव्हेशन इन इन्क्लूजन अँड विमेन्स एम्पॉवरमेंट इन डेअरी’ या श्रेणीतही एनडीएसच्या याच उपक्रमाला पुरस्कार मिळाला. ग्रामीण महिलांचा दुग्धव्यवसायातील सहभाग वाढविण्याबरोबरच त्यांना या क्षेत्राचे नेतृत्व करण्याची संधी देणे, हा या मॉडेलचा महत्त्वाचा भाग आहे. महिलांच्या आर्थिक सहभागातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरत आहे.
श्वेतक्रांती 2.0 ला मिळणार बळ
भारत सरकारच्या श्वेतक्रांती 2.0 या संकल्पनेत दुग्ध सहकारी संस्थांचे बळकटीकरण, दूध संकलन व्यवस्थेचा विस्तार आणि दुग्धव्यवसायापासून वंचित राहिलेल्या समुदायांना संघटित दुग्धव्यवस्थेशी जोडण्यावर भर देण्यात आला आहे. महिला नेतृत्वाखालील आणि शेतकरी मालकीच्या सहकारी संस्थांना प्रोत्साहन देणे, हेही या संकल्पनेतील महत्त्वाचे उद्दिष्ट आहे.
