नवी दिल्ली - कर्नाटकातील बेळगावी येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नाच्या अवघ्या चार महिन्यांतच एका व्यक्तीने आपल्या पत्नीची हत्या केली. त्याने तिचा मृतदेह बेडखाली लपवून पळ काढला.

दरम्यान, आरोपी आकाश कंबरची आई घरी परतली तेव्हा तिला तिची 20 वर्षांची सून साक्षीचा मृतदेह आढळला. त्यानंतर तिने पोलिसांना माहिती दिली. आकाशने तीन दिवसांपूर्वी साक्षीची हत्या केली आणि तेथून पळून गेल्याचे वृत्त आहे. महिलेच्या हत्येपासून त्याचा फोन बंद आहे.

पीडितेच्या कुटुंबाचा हुंड्यासाठी छळाचा आरोप-

या संपूर्ण घटनेप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी आकाशचा शोध सुरू केला आहे. मात्र, गुन्ह्यामागील कारण अद्याप अस्पष्ट आहे. पीडितेच्या कुटुंबाने हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप करत आकाशविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

एनसीआरबीचे आकडे काय सांगतात?

महत्त्वाचे म्हणजे, राष्ट्रीय गुन्हे नोंद ब्युरो (NCRB) च्या आकडेवारीनुसार, 2023 मध्ये हुंडा संबंधित गुन्ह्यांमध्ये 14 टक्क्यांनी वाढ झाली, देशभरात 15,000 हून अधिक प्रकरणे नोंदवली गेली आणि वर्षभरात 6,100  हून अधिक मृत्यू झाले आहेत.