उधना. दिवाळी आणि छटपूजेच्या सणासुदीच्या काळात रेल्वे प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन भारतीय रेल्वेने विशेष नियोजन केले होते. गुजरातमधील सुरत येथील उधना रेल्वे स्थानकाने या गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी राबवलेल्या उपाययोजनांमुळे नवा आदर्श निर्माण केला आहे. 1 ते 15 नोव्हेंबर 2026 या कालावधीत उधना स्थानकावरून सुमारे 7 लाख प्रवाशांनी प्रवास केला. या प्रवाशांसाठी 62 विशेष आणि 136 नियमित रेल्वेगाड्या चालवण्यात आले आहेत.

उधना स्थानकावर 31 ऑक्टोबर रोजी 10,224 चौरस मीटर क्षेत्रफळाचे अत्याधुनिक ‘यात्री सुविधा केंद्र’ सुरू करण्यात आले. रेल्वे लँड डेव्हलपमेंट अथॉरिटीने (RLDA) विकसित केलेल्या या केंद्राची एकावेळी सुमारे 15 हजार प्रवाशांना सामावून घेण्याची क्षमता आहे. भारतीय रेल्वेतील अशा प्रकारचे हे सर्वात मोठे प्रवासी सुविधा केंद्र असल्याचा दावा करण्यात आला आहे. याशिवाय 2,550 चौरस मीटरचे स्वतंत्र प्रतीक्षाक्षेत्रही उपलब्ध आहे.

या केंद्रात प्रवाशांसाठी १० तिकीट खिडक्या, स्वच्छतागृहे, पिण्याचे पाणी, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांसाठी आसनव्यवस्था, बालकांना दूध पाजण्यासाठी स्वतंत्र कक्ष, 32 एचव्हीएलएस पंखे आणि सीसीटीव्ही यंत्रणा उभारण्यात आली आहे. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी वॉर रूम आणि आधुनिक देखरेख व्यवस्थेचाही वापर करण्यात आला आहे. 

दरम्यान, 1 ते 15 नोव्हेंबरदरम्यान भारतीय रेल्वेने देशभरातून 161 विशेष रेल्वेगाड्या चालवल्या. त्यातून सुमारे 4.20 लाख अतिरिक्त प्रवाशांनी प्रवास केला. उधना, अहमदाबाद आणि वडोदरा येथे केलेल्या नियोजनामुळे सणासुदीच्या काळातील प्रवासी गर्दी हाताळण्यास मदत झाली आहे.