नवी दिल्ली: इंदूरच्या बृजेश्वरी ॲनेक्स निवासी परिसरातील एका घरात आग लागली. या घटनेत आठ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. आधी मृतांचा आकडा सात सांगितला जात होता, मात्र बचावकार्यादरम्यान एका मुलाचा मृतदेहही सापडला.

या प्रकरणी इंदूरचे पोलीस आयुक्त संतोष कुमार सिंह यांनी सांगितले की, प्राथमिक तपासानुसार, घराबाहेर एक इलेक्ट्रिक वाहन चार्ज केले जात होते आणि चार्जिंग पॉईंटमध्ये स्फोट झाला. यानंतर, वाहनातून घरात आग पसरली. घरात 10 पेक्षा जास्त गॅस सिलिंडरही ठेवले होते, त्यापैकी काहींचा स्फोट झाला. या घटनेत ८ जणांचा मृत्यू झाला आहे. तीन जणांना वाचवण्यात आले आहे. हे घर पॉलिमरचा व्यवसाय करणाऱ्या मनोज पुगलिया यांचे होते. घरात काही ज्वलनशील रसायनेही ठेवण्यात आली होती.

मृतांची नावे

  • मनोज पुगालिया (घरमालक)
  • सिमरन
  • विजय सेठिया
  • सुमन सेठिया
  • राशी
  • छोटू सेठिया

सातव्या आणि आठव्या व्यक्तींची नावे अद्याप जाहीर करण्यात आलेली नाहीत.

सुरक्षित वाचवण्यात आलेले-

  • सौरभ
  • सुनिता
  • सोनिल

शेजाऱ्यांनी सांगितले की, सकाळी किंकाळ्या ऐकून ते धावत बाहेर गेले आणि त्यांना घर पेटलेले दिसले. त्यांनी तात्काळ अग्निशमन दल आणि पोलिसांना माहिती दिली. शेजाऱ्यांनी पाण्याच्या बादल्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला, पण तोपर्यंत आग संपूर्ण घरात पसरली होती.  आठ जणांच्या मृत्यूमुळे  कॉलनीत  शोककळा पसरली आहे. सर्वजण आगीत जिवंत जळाले.