Bihar Free Electricity : बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बिहारमधील जनतेला एक मोठी भेट  दिली आहे. बिहारमधील जनतेला आता 125 युनिटपर्यंत मोफत वीज मिळणार आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या एक्स हँडलवरून ही माहिती ट्विट केली आहे.

मुख्यमंत्र्यांनी लिहिले की, आम्ही सुरुवातीपासूनच सर्वांना स्वस्त दरात वीज पुरवत आहोत. आता आम्ही निर्णय घेतला आहे की 1 ऑगस्ट 2025 पासून, म्हणजेच जुलै महिन्याच्या बिलातून, राज्यातील सर्व घरगुती ग्राहकांना 125 युनिटपर्यंतच्या विजेसाठी कोणतेही पैसे द्यावे लागणार नाहीत.

राज्यातील एकूण 1 कोटी 67 लाख कुटुंबांना याचा फायदा होईल. आम्ही असेही ठरवले आहे की पुढील तीन वर्षांत, या सर्व घरगुती ग्राहकांना त्यांच्या घरांच्या छतावर किंवा जवळच्या सार्वजनिक ठिकाणी त्यांची संमती घेऊन सौर ऊर्जा प्रकल्प बसवून त्याचा लाभ दिला जाईल.

कुटीर ज्योती योजनेअंतर्गत, अत्यंत गरीब कुटुंबांसाठी सौर ऊर्जा प्रकल्प बसवण्याचा संपूर्ण खर्च राज्य सरकार उचलेल आणि अन्य लाभार्थ्यांनाही सरकार पुरेशी मदत करेल.

यामुळे घरगुती ग्राहकांना आता 125 युनिटपर्यंतच्या विजेवर कोणताही पैसा खर्च करावा लागणार नाही आणि एका अंदाजानुसार, पुढील तीन वर्षांत राज्यात 10 हजार मेगावॅटपर्यंत सौरऊर्जा उपलब्ध होईल.