जेएनएन, नवी दिल्ली: संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनाच्या शुन्य काळात बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांना लोकसभेत बोलण्याची संधी मिळाली. यावेळी मागील वर्षापासून संपूर्ण महाराष्ट्राला हळहळवणाऱ्या बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणावर त्यांनी लोकसभेत प्रश्न उपस्थित केला. आणि राज्य सरकारच्या गृहमंत्र्यावर टीका करत केंद्रीय गृहमंत्र्यांकडे या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली.

बीडमधील कायदा सुव्यवस्था बिघडलेली 

लोकसभेत आज राज्यातील बीड जिल्ह्यात घडलेल्या विविध घटनांच्या संदर्भाने उपस्थित झालेल्या कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नांबाबत आवाज उठविला. मस्साजोग या गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) आणि परळी येथील व्यापारी महादेव मुंडे (Mahadev Munde) यांच्या क्रूर हत्या झाल्या होत्या. त्यांच्या कुटूंबाला न्याय देण्याची मागणी त्यांनी केली.

पिडीत कुटुंबांना न्याय मिळवून द्यावा

बीड जिल्हा हा राज्यातील महत्त्वाच्या जिल्हा असून या भागाने राज्याच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. भाजपाचे ज्येष्ठ नेते स्व गोपीनाथजी मुंडे यांनी या जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले. पण गेल्या दोन वर्षांत या जिल्ह्यात घडलेल्या घटना माणूसकीला शोभणाऱ्या नाहीत. मस्साजोग या गावचे सरपंच संतोष देशमुख आणि परळी येथील व्यापारी महादेव मुंडे यांच्या क्रूर हत्या झाल्या. याबाबत महाराष्ट्राचे गृहमंत्री ठोस कारवाई करताना दिसत नाहीत. यामुळे देशाच्या केंद्रीय गृहमंत्री महोदयांनी यामध्ये हस्तक्षेप करावा आणि पिडीत कुटुंबांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली.

प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी

    तसेच, पिडीत कुटुंबीय न्यायासाठी सगळीकडे दाद मागत आहे परंतु त्यांना न्याय मिळत नाही हे निदर्शनास आणून दिले. या प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी देखील सुळे यांनी लोकसभेत केली.