मुंबई. देशातील दुसरी वंदे भारत स्लीपर ट्रेन मुंबई-बंगळुरूतील केएसआर बंगळुरू रेल्वे स्थानकावर दाखल झाली असून, तिच्या अंतिम चाचण्यांना आता सुरुवात होणार आहे. ही अत्याधुनिक स्लीपर ट्रेन मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) ते केएसआर बंगळुरू दरम्यान धावणार असून, भारतातील सर्वात वेगवान रात्रकालीन रेल्वेगाड्यांपैकी एक ठरण्याची अपेक्षा आहे.

रेल्वे प्रशासनाकडून बंगळुरू येथे या ट्रेनच्या तांत्रिक प्रणाली, ब्रेकिंग, सुरक्षा यंत्रणा, प्रवासी सुविधा आणि विविध कार्यक्षमतेची अंतिम तपासणी केली जाणार आहे. या चाचण्या यशस्वी झाल्यानंतर रेल्वे सुरक्षा आयुक्तांची मंजुरी मिळाल्यावर ही ट्रेन प्रवाशांच्या सेवेत दाखल होईल.

प्रवासाचा वेळ वाचणार -

मुंबई–बंगळुरू मार्गावरील प्रवाशांसाठी ही सेवा मोठा दिलासा ठरणार आहे. सध्या या मार्गावरील प्रवासाला 20 ते 24 तासांचा कालावधी लागतो. वंदे भारत स्लीपर सुरू झाल्यानंतर हा प्रवास कमी वेळेत पूर्ण होण्याची शक्यता असून, व्यवसाय, आयटी क्षेत्रातील कर्मचारी आणि नियमित प्रवाशांना त्याचा मोठा फायदा होणार आहे.

काय-काय असणार सुविधा?

वंदे भारत स्लीपरमध्ये आधुनिक आणि आरामदायी सुविधा देण्यात आले आहेत. वातानुकूलित स्लीपर कोच, एर्गोनॉमिक बर्थ, प्रत्येक प्रवाशासाठी चार्जिंग पॉइंट आणि वाचन दिवे, जीपीएस आधारित प्रवासी माहिती प्रणाली, सीसीटीव्ही सुरक्षा, अग्निसुरक्षा प्रणाली तसेच जैव-व्हॅक्यूम शौचालयांसारख्या सुविधा उपलब्ध असतील. प्रवाशांचा रात्रीचा प्रवास अधिक सुरक्षित, आरामदायी आणि वेगवान करण्यावर या ट्रेनमध्ये विशेष भर देण्यात आला आहे.

    उद्घाटनाची तारीक अन् वेळापत्रक लवकरच होणार जाहीर -

    रेल्वे मंत्रालयाकडून या ट्रेनच्या उद्घाटनाची तारीख आणि नियमित वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाण्याची शक्यता आहे. अंतिम चाचण्या पूर्ण झाल्यानंतर मुंबई–बंगळुरू वंदे भारत स्लीपर सेवा अधिकृतपणे सुरू होईल. या सेवेमुळे महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन प्रमुख राज्यांमधील रेल्वे संपर्क अधिक वेगवान आणि आधुनिक होणार असल्याचे मानले जात आहे.