नवी दिल्ली: Phuket Delhi flight hits turbulence: एअर इंडियाने मंगळवारी पुष्टी केली की, फुकेटहून दिल्लीला येणाऱ्या AI2379 या विमानाला हवेत असताना जोरदार वाऱ्याचा (टर्बुलेंस) धक्का बसला, ज्यामुळे विमानाच्या उंचीत क्षणिक बदल झाला.

विमान दिल्लीत सुरक्षितपणे लँड झाले आणि सर्व प्रवासी व कर्मचारी सुखरूप खाली उतरले. एअरलाइनने एका निवेदनात म्हटले आहे की, यात कोणीही गंभीर जखमी झाले नाही. एअर इंडियाच्या प्रवक्त्यानुसार, काही प्रवासी आणि कर्मचाऱ्यांना किरकोळ दुखापत झाली असून, खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना विमानतळावरील वैद्यकीय सुविधेकडे नेण्यात आले आहे. एअरलाइनचे विमानतळ पथक आणि वैद्यकीय कर्मचारी त्यांच्यावर उपचार करत आहेत.

प्रवक्त्याने सांगितले, आमच्या प्रवाशांची आणि कर्मचाऱ्यांची सुरक्षा व कल्याण हे एअर इंडियाचे सर्वोच्च प्राधान्य आहे. आम्ही बाधित झालेल्यांना सर्व आवश्यक मदत पुरवत आहोत आणि तपासात संबंधित अधिकाऱ्यांना पूर्ण सहकार्य करत आहोत. ही घटना फुकेतहून राष्ट्रीय राजधानीकडे जाणाऱ्या विमानात घडली. या प्रकरणाचा तपास सुरू असून पुढील तपशिलाची प्रतीक्षा आहे.