जेएनएन, मुंबई:l राज्यातील महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर अवघ्या दीड वर्षांच्या कालावधीत राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंधित तिसरा मोठा राजीनामा समोर आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. नाशिकच्या कथित भोंदूबाबा प्रकरणामुळे अडचणीत आलेल्या रुपाली चाकणकर यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.
नाशिकमधील अशोक खरात प्रकरण उघडकीस आल्यानंतर त्याचे काही धागेदोरे चाकणकर यांच्याशी जोडले जात असल्याचा आरोप होत होता. या पार्श्वभूमीवर वाढत्या राजकीय दबावामुळे त्यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा सादर केला. यानंतर त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदावरूनही पायउतार व्हावे लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
महायुती सरकारच्या कार्यकाळातील हा तिसरा महत्त्वाचा राजीनामा मानला जात आहे. यापूर्वी धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. वाल्मिक कराड कनेक्शनमुळे त्यांच्यावर आरोप झाले होते, ज्यामुळे त्यांना पद सोडावे लागले. त्यानंतर माणिकराव कोकाटे यांनाही कृषिमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. शेतकऱ्यांबाबत केलेल्या वादग्रस्त विधानांमुळे त्यांच्यावर टीकेची झोड उठली होती.
आता रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अस्वस्थता वाढली असून, विरोधकांनी महायुती सरकारवर जोरदार टीका सुरू केली आहे. सरकारमधील सातत्याने घडणाऱ्या अशा घटनांमुळे प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे.
दरम्यान, या सर्व घडामोडींमुळे आगामी राजकीय समीकरणांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महायुती सरकारसमोर आता स्थैर्य राखण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.
हेही वाचा: Rupali Chakankar Resignation: राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे दिला राजीनामा
