सोलापूर. Laxman Hake: सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात मराठा समर्थक आणि ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या समर्थकांमध्ये जोरदार राडा झाल्याची घटना समोर आली आहे. मोहोळ तालुक्यातील आडेगाव येथे बिरोबा मंदिराच्या यात्रेदरम्यान हा प्रकार घडला. यात्रेत लक्ष्मण हाके उपस्थित असताना त्यांच्या उपस्थितीवर काही मराठा समर्थकांनी आक्षेप घेतला. ‘तुम्ही इथे कशाला आलात?’ असा जाब विचारत काही जणांनी हाके यांच्या दिशेने धाव घेण्याचा प्रयत्न केला. यानंतर दोन्ही बाजूंच्या समर्थकांमध्ये सुरुवातीला शाब्दिक चकमक झाली आणि त्याचे रूपांतर हाणामारीत झाले.

माहितीनुसार, आडेगाव येथील बिरोबा मंदिराच्या यात्रेला लक्ष्मण हाके उपस्थित होते. यावेळी मराठा समर्थकांनी त्यांच्या उपस्थितीवर नाराजी व्यक्त करत त्यांना जाब विचारला. यात्रेत येण्याचे कारण काय, असा सवाल करत काही जणांनी त्यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. सुरुवातीला दोन्ही बाजूंनी शाब्दिक वाद झाला. मात्र, काही वेळातच परिस्थिती चिघळली आणि दोन्ही गटांतील समर्थकांमध्ये हाणामारी झाली. या घटनेमुळे यात्रेच्या ठिकाणी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.

दरम्यान, या घटनेनंतर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी प्रतिक्रिया देत या प्रकाराचा निषेध नोंदवला आहे. देवाच्या दारात अशा प्रकारचे कृत्य करणे कितपत योग्य आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. आम्ही कुठे फिरायचेच नाही का? असा प्रश्न विचारत सार्वजनिक ठिकाणी जाण्यावरून अशा प्रकारे विरोध करणे योग्य नसल्याचे त्यांनी म्हटले.

‘धमक्यांना घाबरणार नाही, लढा आणखी तीव्र करू’

या घटनेवर बोलताना लक्ष्मण हाके म्हणाले की, देवाच्या दारात अशा प्रकारची घटना घडणे दुर्दैवी आहे. आम्ही कुठे फिरायचेच नाही का? आम्हाला सार्वजनिक ठिकाणी जाण्याचा अधिकार नाही का? अशा प्रकारे विरोध करून धमकावण्याचा प्रयत्न केला जात असेल, तरी आम्ही घाबरणार नाही. अशा धमक्यांना न घाबरता आमचा लढा आणखी तीव्र करू, अशी भूमिका त्यांनी मांडली.