बारामती. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आयुष्यातील शेवटच्या क्षणांची आठवण करून देणारा एक अत्यंत भावनिक प्रसंग लवकरच समोर येणार आहे. विमान अपघातापूर्वी अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यात झालेला अखेरचा फोन कॉल जनतेसमोर आणण्यात येणार आहे. विशेष म्हणजे हा ऑडिओ संवाद स्वतः सुनेत्रा पवार जाहीर करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
माहितीनुसार, विमानात बसण्यापूर्वी अजित पवार यांनी सुनेत्रा पवार यांना फोन केला होता. हा संवाद त्यांच्या आयुष्यातील शेवटचा ठरला. या फोन कॉलमध्ये नेमकं काय बोलणं झालं, याबाबत अनेक दिवसांपासून राजकीय वर्तुळात आणि जनतेमध्ये उत्सुकता होती. आता हीच ऑडिओ क्लिप सार्वजनिक करण्यात येणार असल्याने भावनिक वातावरण निर्माण झालं आहे.
अजित पवार यांच्या आकस्मिक निधनानंतर राज्यभरातून शोककळा पसरली होती. एक निर्णयक्षम नेता म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या जाण्याने केवळ राजकीयच नव्हे, तर वैयक्तिक पातळीवरही अनेकांना मोठा धक्का बसला. अशा पार्श्वभूमीवर हा शेवटचा संवाद ऐकवला जाणार असल्याने अनेकांच्या डोळ्यांत अश्रू तरळण्याची शक्यता आहे.
माहितीनुसार, हा ऑडिओ कोणताही राजकीय संदेश देण्यासाठी नसून, एक पती-पत्नीमधील साधा, मनाला भिडणारा संवाद आहे. त्यामुळेच तो संवाद जनतेसमोर आणण्याचा निर्णय सुनेत्रा पवार यांनी घेतल्याचं सांगितलं जात आहे.
हा ऑडिओ कधी आणि कुठे जाहीर केला जाणार, याबाबत अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नसली, तरी “लवकरच” तो समोर येईल, असं संकेत मिळत आहेत. अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा देणारा हा क्षण राज्याच्या राजकीय इतिहासात भावनिक ठसा उमटवणारा ठरण्याची शक्यता आहे.
