जेएनएन, पुणे: सोलापूर–मुंबई मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेसच्या थांब्याबाबत महत्त्वाचा निर्णय मध्य रेल्वेकडून घेण्यात आला आहे. 24 नोव्हेंबरपासून वंदे भारत एक्सप्रेसला दौंड स्थानकावर थांबा मिळणार असल्याची अधिकृत माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील दौंड, बारामती, इंदापूर तसेच साताऱ्यातील फलटण, खटाव आणि सोलापूर जिल्ह्यातील करमाळा, माढा, माळशिरस तालुक्यांतील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
प्रवास आता अधिक सोपा होणार
10 फेब्रुवारी 2024 पासून सुरू झालेल्या सोलापूर–मुंबई वांदे भारत एक्सप्रेसने प्रवास अधिक वेगवान केला असला तरी दौंड, बारामती आणि फलटण परिसरातील प्रवाशांना सोलापूर किंवा पुणे येथे जाऊन गाडी पकडावी लागत होती. आता दौंड हा पुणे–सोलापूर पट्ट्यातील मध्यवर्ती स्थानक बनल्याने या भागातील हजारो प्रवाशांसाठी मुंबई आणि पुणे प्रवास आता अधिक सोपा होणार आहे.
सोलापूर ते पुणे वंदे भारतचा प्रवास अवघ्या सात तासांवर (6.45 तास) आला असून औद्योगिकदृष्ट्या महत्त्वाच्या दौंड–भिगवण–फलटण पट्ट्यातील उद्योगपती, उद्योजक, अभियांत्रिकी क्षेत्रातील अधिकारी आणि विद्यार्थ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे. दौंड तालुक्यात असलेले साखर कारखाने आणि वैद्यकीय संशोधन संस्थांशी संबंधित व्यावसायिकांसाठी हा तांत्रिक व व्यावसायिक प्रवास सुलभ होणार आहे.
लाखो प्रवाशांना दिलासा
गेल्या दोन वर्षांपासून नागरिक आणि स्थानिक लोकप्रतिनिधींकडून दौंड येथे थांब्याची मागणी सातत्याने होत होती. या मागणीला प्रतिसाद देत मध्य रेल्वेने अखेर थांबा मान्य केला असून 24 नोव्हेंबरपासून गाडी रोज दौंड येथे थांबेल. बारामती, इंदापूर, फलटण, करमाळा आणि माढा परिसरातील लाखो प्रवाशांसाठी हा निर्णय मोठा दिलासा देणारा ठरणार आहे.
