जेएनएन, पुणे. Ashadhi Wari 2026: आषाढी वारीतील सर्वाधिक भावस्पर्शी आणि परंपरागत विधींपैकी एक असलेला संत ज्ञानेश्वर माउलींच्या पादुकांचा नीरा स्नान सोहळा आज भक्तिभावाच्या वातावरणात संपन्न झाला. नीरा नदीच्या दत्तघाटावर वेदमंत्रांच्या घोषात पादुकांना पवित्र जलाने अभिषेक करण्यात आला. यावेळी "ज्ञानोबा-तुकाराम" आणि "माऊली-माऊली"च्या अखंड जयघोषाने परिसर दुमदुमून गेला.
वाल्हे येथील मुक्कामानंतर संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी नीरा येथे दाखल झाली. परंपरेनुसार पालखीतून पवित्र पादुका बाहेर काढून धार्मिक विधींच्या साक्षीने त्यांचे नीरा नदीत स्नान घालण्यात आले. या सोहळ्याचे दर्शन घेण्यासाठी नदीच्या दोन्ही तीरांवर हजारो वारकरी आणि भाविकांनी मोठी गर्दी केली होती. टाळ-मृदुंगाचा निनाद, हरिनामाचा गजर आणि वारकऱ्यांच्या भक्तिभावामुळे संपूर्ण परिसर अध्यात्मिक वातावरणाने भारावून गेला.
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातील नीरा स्नान हा अनेक दशकांपासून जपला गेलेला महत्त्वाचा धार्मिक विधी मानला जातो. पुणे जिल्ह्याची सीमा ओलांडून सातारा जिल्ह्यात प्रवेश करण्यापूर्वी पादुकांना नीरा नदीत स्नान घालण्याची परंपरा आजही श्रद्धेने पाळली जाते. या पवित्र क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक नीरा येथे दाखल झाले होते.
नीरा स्नानाचा विधी पूर्ण झाल्यानंतर संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा पुढील मुक्कामासाठी लोणंदकडे मार्गस्थ झाला. मार्गभर विविध ठिकाणी ग्रामस्थांनी फुलांची उधळण करत आणि हरिनामाच्या गजरात पालखीचे उत्स्फूर्त स्वागत केले. भक्ती, श्रद्धा आणि परंपरेचा संगम अनुभवायला मिळाल्याने संपूर्ण परिसर वारकरी भावनेने भारावून गेला.
हेही वाचा: Jejuri Warakari Accident: जेजुरीतील अपघातात 3 वारकऱ्यांचा मृत्यू, सरकारकडून मदतची मोठी घोषणा
