पुणे. Suresh Kalmadi Passed Away: पुण्याचे माजी खासदार आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते सुरेश कलमाडी यांचे निधन झाले आहे. ते ८२ वर्षांचे होते. वयपरत्वे आजारामुळे त्यांचे निधन झाल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली. त्यांच्या निधनामुळे पुण्याच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात शोककळा पसरली आहे.
सुरेश कलमाडी यांचे पार्थिव आज दुपारी दोन वाजेपर्यंत त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर संध्याकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती कुटुंबीयांकडून देण्यात आली आहे.
राजकीय कारकीर्द-
सुरेश कलमाडी हे पुण्याच्या राजकारणातील एक महत्त्वाचं नाव होतं. त्यांनी पुण्याचे खासदार म्हणून अनेक वर्षे प्रतिनिधित्व केलं. काँग्रेस पक्षात त्यांनी विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या. शहराच्या विकासाशी संबंधित अनेक मुद्द्यांवर ते सातत्याने सक्रिय राहिले.
राष्ट्रकुल घोटाळ्याच्या आरोपांमुळे सुरेश कलमाडी (Suresh Kalmadi) यांची राजकीय कारकीर्द डागाळली होती आणि राजकारणात त्यांचा उतरणीचा काळ सुरु झाला. 2020 च्या राष्ट्रकुल क्रीडा घोटाळ्यात काँग्रेसचे नेते आणि माजी खासदार सुरेश कलमाडी यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप झाले होते, ज्यात आयोजन समितीचे अध्यक्ष म्हणून आर्थिक गैरव्यवहारांचा समावेश होता.
पुण्याच्या विकासात योगदान-
खासदार असताना पुण्यातील पायाभूत सुविधा, क्रीडा क्षेत्राचा विकास, शिक्षण आणि नागरी प्रश्नांवर त्यांनी काम केल्याचं मानलं जातं. पुण्याला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवून देण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सुरेश कलमाडी यांच्या निधनाने देशाच्या राजकारणातील एक अनुभवी, संघर्षातून घडलेला आणि दीर्घ सार्वजनिक जीवनाचा वारसा असलेला नेता आपण गमावला आहे.
— Sharad Pawar (@PawarSpeaks) January 6, 2026
भारतीय हवाई दलात पायलट म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या सुरेश कलमाडी यांनी पुढे… pic.twitter.com/yHXWfonjmc
शोकसंवेदना-
सुरेश कलमाडी यांच्या निधनावर विविध राजकीय पक्षांचे नेते, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर तसेच नागरिकांकडून शोकसंवेदनांचा वर्षाव होत आहे. अनेकांनी त्यांच्या आठवणींना उजाळा देत पुण्याच्या सार्वजनिक जीवनातील त्यांचं योगदान अधोरेखित केलं आहे.
सुरेश कलमाडी यांच्या निधनाने पुण्याच्या राजकारणातील एक ज्येष्ठ आणि अनुभवी नेतृत्व हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
