पुणे. Sharad Pawar News: राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) अध्यक्ष शरद पवार यांना सोमवारी दुपारी बारामती येथील त्यांच्या निवासस्थानावरून पुण्यातील रुग्णालयात नेण्यात आले. घसा आणि खोकल्याचा त्रास होत असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

85 वर्षीय शरद पवार यांना घशाच्या संसर्गामुळे रुबी हॉल क्लिनिकमध्ये नेण्यात येत असल्याचे त्यांच्या जवळच्या सहकाऱ्याने सांगितले. रुबी हॉल क्लिनिकचे मुख्य हृदयरोगतज्ज्ञ आणि व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ. परवेझ ग्रँट यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. पवार रुग्णालयात दाखल होताच डॉक्टरांची एक टीम त्यांची तपासणी करेल आणि त्यानुसार पुढील उपचाराचा निर्णय घेतला जाईल, असे डॉ. ग्रँट म्हणाले.

अजित पवार यांच्या निधनानंतर गेल्या 13 दिवसांपासून शरद बारामती, मुंबई आणि पुण्यातील घरी दौरे करत होते. तर, राज्यभरातून राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते त्यांच्या भेटीसाठी, त्यांचे सांत्वन करण्यासाठी येत आहेत. दरम्यान, आज शरद पवार यांना खोकल्याचा त्रास जाणवू लागल्याने पुण्यातील रुबी क्लिनिकमध्ये तपासणीसाठी नेण्यात आलं आहे.

खासदार सुप्रिया सुळे पवारांसोबत -

शरद पवारांच्या कन्या आणि खासदार सुप्रिया सुळे त्यांच्यासमवेत रुबी हॉस्पिटलमध्ये आहेत. दरम्यान, आज सकाळपासूनच शरद पवार यांना खोकल्याचा त्रास होत आहे. रुबी हॉलचे डॉक्टर ग्रँट यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील काही वेळात शरद पवार यांची तपासणी केल्यानंतर त्यांना ऍडमिट करायचे की नाही, याचा निर्णय घेतला जाईल.

सध्या शरद पवार यांच्यावर तज्ञ डॉक्टरांचे पथक लक्ष ठेवून आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची प्राथमिक माहिती समोर येत असली, तरी डॉक्टरांकडून अधिकृत वैद्यकीय बुलेटिनची प्रतीक्षा आहे. खबरदारीचा उपाय म्हणून काही वैद्यकीय चाचण्या करण्यात येत आहेत.

    दरम्यान, शरद पवार यांच्या तब्येतीबाबत माहिती मिळताच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, कार्यकर्ते आणि समर्थकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. अनेक ज्येष्ठ नेते आणि पदाधिकाऱ्यांनी रुग्णालयात धाव घेतली असून त्यांच्या प्रकृतीची चौकशी सुरू आहे.