जेएनएन, पुणे: शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात पुणे पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पिंपरी चिंचवडचे युवक अध्यक्षांनी पोलिसात तक्रार केली आहे. चेतन पवार या अर्जदाराने संजय गायकवाड यांच्या विरोधात तक्रार केली आहे. संजय गायकवाड यांनी कॅन्टीन चालकाला मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी तक्रारीत करण्यात आली आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

बुलढाण्याचे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी 8 जुलैच्या रात्री मुंबई स्थित आमदार निवासातील कॅन्टीनमध्ये जेवणाची ऑर्डर दिली. त्यांना ऑर्डरप्रमाणे रूममध्ये जेवणही पुरवण्यात आलं. मात्र जेवणात देण्यात आलेलं डाळ आणि भात हे शिळ होतं व त्याचा वास येत होता, असा आरोप करत आमदार संजय गायकवाड यांनी थेट आमदार निवासातील कॅन्टीन व्यवस्थापकाला धारेवर धरलं, आणि मारहाण केली. यापूर्वीही मी कॅन्टीनमधील जेवणाची दोन ते तीन वेळा तक्रार केली असल्याचे संजय गायकवाड यांनी माध्यमांना सांगितलं.

एकनाथ शिंदे यांनी दिला होता समज

 संजय गायकवाड यांनी केलेली मारहाण समर्थनीय नाही. लोकप्रतिनिधी या नात्याने अन्नाच्या दर्जाबाबत रितसर तक्रारी करुन त्यावर कायदेशीर कारवाई करता येऊ शकते, पण मारहाण करणे हा पर्याय असू शकत नाही. संजय गायकवाड यांना समज दिली असून असं करणं योग्य नाही, आम्ही याचं समर्थन करत नाही" हे सांगितल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

आमदारांच्या प्रतिष्ठेला कलंक

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही या मारहाणीच्या घटनेचा निषेध केला आणि म्हटले की, या प्रकारचे वर्तन अस्वीकार्य आहे आणि कोणासाठीही आदरणीय नाही. आमदार म्हणून गायकवाड यांच्या कृत्याने सर्व आमदारांच्या प्रतिष्ठेला कलंक लावला आहे, लोकप्रतिनिधींमध्ये जबाबदारीची गरज असायला पाहिजे, असं फडणवीस म्हणाले. 

    संजय गायकवाड यांची भूमिका

    आमदार निवासमध्ये डाळ-भात आणि पोळी जेवण मागवलं होतं. पहिला घास खाल्ला तर आंबट लागला आणि मला उलटीही झाली. त्यानंतर मी डाळीचा वास घेतला, तर भयंकर होता. त्यामुळे मी जाब विचारण्यासाठी कॅन्टिनमध्ये गेलो. महाराष्ट्रातील ग्रामीण भागात लोक इथे येतात. तसेच याआधी देखील मी दोन-तीन वेळा त्यांना समज दिली होती. एका आमदाराला हे लोक जर विषारी जेवण देतात, मग सामान्य माणसांचं काय होत असेल?, असा सवाल संजय गायकवाड यांनी उपस्थित केला.