जेएनएन, पुणे: वाहनांच्या नंबरप्लेटवरील ‘MH-12’ हा आरटीओ कोड पुण्यातील वाहनांसाठी ‘MH-12’ हा केवळ नोंदणी क्रमांक नसून, पुणेकरांच्या दैनंदिन आयुष्याचा आणि शहराच्या ओळखीचा एक भाग बनला आहे. मात्र, पुण्यात वाढत असलेल्या वाहनसंख्येमुळे आता या ‘MH-12’ नंबरप्लेटसमोरच मोठे आव्हान उभे राहिले आहे.
पुणे आरटीओमधील सध्याची ‘ZZ’ अक्षरमालिका येत्या 10 ते 15 दिवसांत संपण्याची शक्यता आहे. त्यामुळे नव्याने वाहनांची नोंदणी करताना कोणता क्रमांक वापरायचा, याचा विचार सुरू झाला आहे. याच पार्श्वभूमीवर पुण्यासाठी पर्यायी क्रमांकाचा प्रस्ताव मांडण्यात आला असून, तो मंजूर झाल्यास भारतामध्ये पहिल्यांदाच अशा पद्धतीचा आरटीओ कोड वापरला जाण्याची शक्यता आहे.
वाहनांची संख्या वाढली, नोंदणी क्रमांकाची मर्यादा संपली
पुणे शहर आणि जिल्ह्यात गेल्या काही वर्षांत वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. दररोज मोठ्या संख्येने दुचाकी आणि चारचाकी वाहनांची नोंदणी आरटीओ कार्यालयात होत आहे. परिणामी उपलब्ध नोंदणी क्रमांकांची मालिका वेगाने संपत आहे.
सध्या पुणे आरटीओमध्ये दुचाकींसाठी ‘ZY’, तर चारचाकी वाहनांसाठी ‘ZW’ ही अक्षरमालिका सुरू असल्याची माहिती आहे. पुढे ‘ZZ’ मालिका पूर्ण झाल्यानंतर उपलब्ध क्रमांकांची सध्याची रचना संपुष्टात येणार आहे. त्यामुळे त्यानंतर नव्या वाहनांना कोणता कोड द्यायचा, हा प्रश्न निर्माण झाला आहे.
‘MH-61’ची चर्चा, पुणेकरांचा विरोध
नवीन आरटीओ कोड देण्याच्या चर्चेत ‘MH-61’ हा क्रमांक पुण्यासाठी देण्याचा प्रस्ताव असल्याची चर्चा रंगली. मात्र, या प्रस्तावाला पुणेकर आणि काही लोकप्रतिनिधींकडून विरोध करण्यात आला.
यामागे केवळ भावनिक कारण नाही, तर ‘MH-12’ ही पुण्याची स्वतंत्र ओळख बनली असल्याची भावना आहे. मुंबईसाठी ‘MH-01’, ठाण्यासाठी ‘MH-04’ किंवा नागपूरसाठी ‘MH-31’ या कोडप्रमाणे पुण्याचा ‘MH-12’ कोडही वाहनांशी जोडलेली ओळख बनला आहे.
पुण्याबाहेरही एखाद्या वाहनावर ‘MH-12’ दिसले की ते वाहन पुण्याचे असल्याची ओळख सहज पटते. त्यामुळे अचानक ‘MH-61’ किंवा अन्य नवीन कोड लागू करण्याऐवजी ‘MH-12’ कायम ठेवून त्यासोबत नवीन कोड देण्याचा पर्याय पुढे आला आहे.
MH-12 कायम ठेवून नवा कोड देण्याचा प्रस्ताव
पुणेकरांची भावना लक्षात घेता ‘MH-12’ पूर्णपणे बदलण्याऐवजी त्याच्यासोबत नवीन कोड देण्याचा पर्याय विचाराधीन असल्याचे समोर आले आहे.
या पर्यायाला मंजुरी मिळाल्यास पुण्यातील जुन्या वाहनांना ‘MH-12’ आणि त्यानंतर नोंदणी होणाऱ्या वाहनांना नव्या पद्धतीचा कोड मिळू शकतो. त्यामुळे पुण्याची पारंपरिक ओळख असलेला ‘MH-12’ कोड कायम ठेवता येईल आणि त्याच वेळी वाढत्या वाहनसंख्येमुळे निर्माण झालेली नोंदणी क्रमांकांची अडचणही सोडवता येईल.
विशेष म्हणजे, हा पर्याय मंजूर झाल्यास भारतात पहिल्यांदाच अशा स्वरूपाची नंबरप्लेट अस्तित्वात येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
पुणेकरांसाठी ‘MH-12’ म्हणजे काय?
‘MH-12’ हा क्रमांक पुण्यातील वाहनांच्या नंबरप्लेटवर दिसतो; मात्र गेल्या अनेक दशकांत तो शहराच्या ओळखीचा एक भाग बनला आहे. पुणे शहराची सांस्कृतिक, शैक्षणिक आणि ऐतिहासिक ओळख जशी वेगळी आहे, तशीच ‘MH-12’चीही एक स्वतंत्र ओळख निर्माण झाली आहे.
पुण्यातून बाहेर पडलेल्या वाहनांकडे पाहिल्यावर ‘MH-12’ हा कोड पाहून ‘पुणे’ अशी ओळख पटते. त्यामुळे नवीन आरटीओ कोड देण्याच्या चर्चेनंतर पुणेकरांमध्येही या विषयाबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
हेही वाचा: तुकाराम मुंढेंचा रक्तपेढ्यांना इशारा? महाराष्ट्र FDA ने रक्तपेढ्यांसाठी प्रथमच जारी केली मार्गदर्शक तत्त्वे
