जेएनएन, पुणे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षा प्रक्रियेतील कथित अनियमितता, पेपरफुटीच्या घटनांबाबत कारवाई आणि परीक्षांमध्ये पारदर्शकता यांसह विविध मागण्यांसाठी पुण्यात सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. एस. एम. जोशी पूल परिसरातील आंदोलकांना पुणे पोलिसांनी नोटीस बजावत परिसर तातडीने रिकामा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र, पोलिसांच्या सूचनेनंतरही विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच आहे.
विद्यार्थ्यांची आंदोलने सुरू
पुण्यात गेल्या काही दिवसांपासून एमपीएससीच्या विविध मागण्यांसाठी विद्यार्थ्यांची आंदोलने सुरू आहेत. एस. एम. जोशी पूल, शास्त्री रस्ता आणि टिळक चौक-अलका चौक या परिसरात आंदोलनाचे वेगवेगळे गट सक्रिय आहेत. एस. एम. जोशी पूल परिसरातील आंदोलनाला आता सातवा दिवस पूर्ण झाला आहे. या ठिकाणी काही आंदोलकांनी उपोषणही सुरू केले आहे.
पोलिसांकडून आंदोलनाची परवानगी नाकारली
पुणे पोलिसांनी आंदोलनासाठी आवश्यक परवानगी देण्यात आलेली नसल्याचे स्पष्ट केले आहे. परवानगी नसताना सार्वजनिक ठिकाणी आंदोलन सुरू ठेवल्यामुळे कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते, असा इशाराही पोलिसांनी दिला आहे. यापूर्वी पोलिसांनी 51 विद्यार्थी तसेच 29 क्लास आणि अभ्यासिका चालकांना नोटिसा बजावले होते.
एस. एम. जोशी पूल परिसरातील आंदोलनामुळे वाहतुकीवर परिणाम होत असल्याचेही पोलिस आणि स्थानिकांकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे आंदोलकांनी आंदोलनासाठी अन्य ठिकाणाचा वापर करावा किंवा आवश्यक परवानगी घ्यावी, अशी भूमिका प्रशासनाने घेतली आहे.
हायकोर्टानेही आंदोलनस्थळ बदलण्याचे सुचवले
दरम्यान, एमपीएससी आंदोलनासंदर्भातील याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. आंदोलनामुळे सामान्य पुणेकरांना त्रास होऊ नये, याची काळजी घेण्याचे निर्देश न्यायालयाने दिले. विद्यार्थ्यांनी न्यायालयावर विश्वास ठेवून अभ्यासाकडे वळावे, असे आवाहनही न्यायालयाने केले. तसेच, राज्य सरकारला एमपीएससी परीक्षांबाबत आतापर्यंत केलेल्या उपाययोजनांचा आणि पुढील कृतीचा रोडमॅप सादर करण्यास सांगण्यात आले आहे.
मात्र, न्यायालयाच्या सुनावणीनंतरही एस. एम. जोशी पूल परिसरातील आंदोलकांनी आंदोलन मागे घेण्यास नकार दिला आहे. या ठिकाणी आंदोलन सुरूच असून विद्यार्थ्यांचा आपल्या मागण्यांवर ठाम राहण्याचा निर्धार आहे. पुण्यातील तीनपैकी एका ठिकाणचे आंदोलन मागे घेण्यात आले असले तरी एस. एम. जोशी पूल आणि अन्य एका ठिकाणी आंदोलन सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.
पेपरफुटी आणि परीक्षेतील पारदर्शकतेचा मुद्दा
एमपीएससीच्या विविध परीक्षांमध्ये पेपरफुटी, परीक्षा रद्द होणे, परीक्षांच्या तारखांबाबत अनिश्चितता आणि भरती प्रक्रियेतील पारदर्शकता यांसारख्या मुद्द्यांवरून विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आहे. औषध निरीक्षक परीक्षेतील पेपरफुटीच्या प्रकरणानंतरही विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला वेग आला आहे. विद्यार्थ्यांकडून परीक्षा प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्याची आणि दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
