जेएनएन, पुणे: इस्राईल –इराण युद्धामुळे मध्यपूर्वेत तणाव शिगेला पोहोचला आहे. गेल्या 11 दिवसांपासून सुरू असलेल्या भीषण संघर्षाचे परिणाम आता भारतातही दिसू लागले आहेत. युद्धात इराणची राजधानी तेहरानसह अनेक शहरांवर मोठे हल्ले झाले आहे. आतापर्यंत 1332 हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. दुसरीकडे, इस्राईल मध्येही इराणी हल्ल्यांमुळे 339 पेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला आहे, तर संयुक्त हल्ल्यांमध्ये सुमारे 12 हजार इराणी नागरिक जखमी झाले आहेत.
या युद्धाचे आर्थिक परिणाम आता भारतावरही उमटू लागले आहेत. आखाती देशांमधून येणाऱ्या व्यावसायिक गॅस पुरवठ्यावर परिणाम झाल्याने उद्योग क्षेत्रात चिंता वाढली आहे. विशेषतः पिंपरी -चिंचवड औद्योगिक पट्ट्यातील लघुउद्योगांना याचा मोठा फटका बसत आहे.
7500 कंपन्यांवर थेट परिणाम
पिंपरी-चिंचवड औद्योगिक क्षेत्रात सुमारे 15 हजार लघुउद्योग कार्यरत आहेत. मात्र गॅस पुरवठा बंद झाल्याने त्यापैकी जवळपास 7500 कंपन्यांचे उत्पादन धोक्यात आले आहे. काही कंपन्यांमधील गॅसचा साठा आधीच संपला असून उर्वरित कंपन्यांचा साठा पुढील चार ते पाच दिवसांत संपण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
उत्पादन निम्म्यावर!
भोसरी येथील “श्री इंजिनिअर्स” या कंपनीत व्यावसायिक गॅस संपल्याने उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. गॅसऐवजी पर्यायी म्हणून प्लाझ्मा मशीनचा वापर सुरू केला असला तरी उत्पादन क्षमतेत मोठी घट झाली आहे. कंपनीचे दिवसाचे उत्पादन जवळपास निम्म्यावर आले आहे.
महिन्याला लाखोंचे नुकसान
या कंपनीची सरासरी महिन्याची उलाढाल सुमारे 40 लाख रुपये असते. मात्र सध्याच्या परिस्थितीत ती जवळपास 20 लाखांनी घटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते, जर पुढील काही दिवसांत गॅस पुरवठा सुरळीत झाला नाही, तर पिंपरी-चिंचवडमधील हजारो कंपन्यांना कोट्यवधी रुपयांचे नुकसान सहन करावे लागू शकते.
उद्योग क्षेत्रात चिंता
गॅसवर आधारित उत्पादन करणाऱ्या अनेक ऑटो पार्ट्स, मेटल कटिंग आणि इंजिनिअरिंग कंपन्यांचे काम जवळपास ठप्प होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे लघुउद्योग संघटनांनी केंद्र आणि राज्य सरकारकडे तातडीने पर्यायी गॅस पुरवठा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.
युद्धाचा थेट परिणाम भारतातील उद्योगांवर होऊ लागल्याने आगामी काळात उद्योग, रोजगार आणि निर्यात यावरही त्याचे मोठे परिणाम दिसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
