Pune Crime news: पुण्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला असून एका प्रकरणाच्या तपासात कोथरुड पोलीस ठाण्यात तीन दलित मुलींचा शारीरिक आणि मानसिक छळ झाल्याचा धक्कादायक आरोप पीडितांनी केला आहे. या गलिच्छ प्रकारानंतर पुण्यासह राज्यातील राजकीय वातावरण प्रचंड तापले असून अनेक पक्ष व संघटना संबंधित पोलिसांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी आक्रमक झाल्या आहेत. आरोपी पोलीस कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यासाठी रविवारी रात्री साडेतीन वाजेपर्यंत सुजात आंबेडकर, अंजली आंबेडकर, रोहित पवार आणि अनेक सामाजिक कार्यकर्ते पीडित मुलींसह पुणे पोलीस आयुक्तालयात ठाण मांडून होते, मात्र तरीही पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेण्यास नकार दिला आहे. या प्रकरणात वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनीही पोलिस आयुक्तांना फोन करून संबंधित पोलिसांवर कारवाईची मागणी केली आहे.
याप्रकरणी आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे की, छत्रपती संभाजीनगर येथील एका व्हीआयपी केसच्या तपासासाठी आलेल्या तेथील पोलिसांसह कोथरुड पोलिसांनीही पुण्यातील मागासवर्गीय मुलींवर जातीवाचक शेरेबाजी करून त्यांना मारहाण केली. याबाबत संबंधित पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याची दोन दिवस मागणी करुनही पोलिस त्याची दखल घेत नाहीत, याबाबत काही सामाजिक कार्यकर्त्यांसह संबंधित मुली पुणे पोलिस आयुक्तालयात दिवसभर बसून आहेत, तरीही पोलिस त्यांची दखल घेत नाहीत. या मुलींना भेटून या संपूर्ण प्रकरणाची माहिती घेतली. मागासवर्गीय मुलींवर जातीवाचक शेरेबाजी करणाऱ्या आणि त्यांना मारहाण करणाऱ्या कोथरुडसह छत्रपती संभाजीनगर पोलिसांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि संबंधित व्हीआयपी केससाठी दबाव कुणी आणला, संबंधित निवृत्त पोलिस अधिकारी कोण आहे? झिरो पोलिस असलेली महिला, या सर्वांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे. कारवाई होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरु राहील, याबाबत सह पोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा साहेब आणि अप्पर पोलिस आयुक्त मनोज पाटील साहेब यांच्याशीही चर्चा केली.
छत्रपती संभाजीनगर येथील एका व्हीआयपी केसच्या तपासासाठी आलेल्या तेथील पोलिसांसह कोथरुड पोलिसांनीही पुण्यातील मागासवर्गीय मुलींवर जातीवाचक शेरेबाजी करून त्यांना मारहाण केली. याबाबत संबंधित पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याची दोन दिवस मागणी करुनही पोलिस त्याची दखल घेत नाहीत, याबाबत काही… pic.twitter.com/9Db3bgNB6r
— Rohit Pawar (@RRPSpeaks) August 3, 2025
काय म्हणाले पोलीस -
दरम्यान पोलिसांनी म्हटले आहे की, मुलींनी त्यांच्यावर शारीरिक व मानसिक छळ झाल्याची तक्रार केली आहे, ती घटना एका खोलीत घडली आहे. सार्वजनिक ठिकाणी घडलेली नाही. त्यामुळे संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांविरोधात कोणतेही पुरावे नाहीत. तसेच मुलींनी दाखल केलेल्या अॅट्रोसिटीच्या तक्रारीत कोणतेही तथ्य आढळलेले नाही. त्यामुळे याप्रकरणात गुन्हा दाखल करता येणार नाही, असे पोलिसांनी पीडित मुलींना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.
काय आहे मुलींचा आरोप ?
याप्रकरणातील तीन दलित समाजाच्या मुलींनी पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. तपासाच्या नावावर पोलिसांनी आमच्यावर जातीवाचक टिप्पणी करत लैंगिक अपमान करणारी शेरेबाजी केली. आमचे इनरवेअर तपासले तसेच पोलीस उपनिरीक्षक कामठे यांनी एका मुलीच्या अंगाला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचाही आरोप केला आहे. मात्र पोलिसांकडून हे आरोप फेटाळले जात आहेत.
पुण्यातील कोथरुड येथे पोलीसांनी तीन मुलींना नेऊन त्यांना जातीवाचक आणि इतर आक्षेपार्ह शब्द वापरुन त्यांचा छळ केल्याचा प्रकार उघडकीस आला. याबाबतची माहिती देणारा एक व्हिडिओ मला 'व्हॉट्सॲप'वर प्राप्त झाला आहे. जर हे खरे असेल तर ही अतिशय गंभीर स्वरुपाची घटना आहे. राज्याच्या…
— Supriya Sule (@supriya_sule) August 2, 2025
तीन मुलींसोबत घडलेल्या प्रकाराची दखल खासदार सुप्रिया सुळे यांनी घेतली असून या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. पुण्यातील कोथरुड येथे पोलिसांनी तीन मुलींना नेऊन त्यांना जातीवाचक आणि इतर आक्षेपार्ह शब्द वापरुन त्यांचा छळ केल्याचा प्रकार उघडकीस आला. याबाबतची माहिती देणारा एक व्हिडिओ मला 'व्हॉट्सॲप'वर प्राप्त झाला आहे. जर हे खरे असेल तर ही अतिशय गंभीर स्वरुपाची घटना आहे. राज्याच्या गृहमंत्र्यांनी या घटनेची गांभीर्याने नोंद घ्यावी. या एकंदर प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
काय आहे प्रकरण -
एका मुलीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.यात तिने तीन मुलींसोबत घडलेला प्रकार सांगितला आहे. या पोस्टमध्ये तिने म्हटले आहे की, रविवारी रात्री छत्रपती संभाजीनगरमधील एका केसचा तपास करण्यासाठी तेथील पोलीस कोथरुडमध्ये आले होते. त्यांनी तीन दलित मुलींना त्यांच्या घरातून चौकशीसाठी ताब्यात घेतले. या तिघींना कोथरुड पोलीस ठाण्यातील वरच्या मजल्यावर असणाऱ्या रिमांड रुममध्ये पाच तास ठेवण्यात आले. यावेळी त्यांचा शारीरिक आणि मानसिक छळ केला. त्यांच्या जातीवरून टिप्पणी करत तुम्ही किती मुलांसोबत झोपला आहात, तुम्ही असंच वागणार तुमची जातच ती आहे. तसेच एका मुलीला लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आल्याचंही समोर आलं आहे. मग तुम्ही लेस्बियन आहात का? कपडे किती तोकडे घालता. अशी पोलिसांनी शेरेबाजी केल्याचा आरोप आहे.