पुणे. Pune News : राज्यातील पहिल्या टप्प्यातील नगरपंचायती व नगरपरिषदांच्या निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी रविवारी थंडावली. मात्र प्रचाराची ही घाई शिरूरमध्ये एका बालिकेच्या जीवावर बेतली आहे. शिरुर नगर परिषदेच्या प्रचारासाठी पुण्याहून शिरूरकडे निघालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्या भरधाव मर्सिडीज कारने एका चिमुकलीला जोरात धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की, चिमुकली चेंडूसारखी रस्त्यावर उडून पडली. रविवारी दुपारी पुणे-अहिल्यानगर महामार्गावर शिरूरच्या बोऱ्हाडेमळा येथे हा अपघात झाला.
शुभ्रा पंढरीनाथ बोऱ्हाडे (वय ४) असे या अपघातात जखमी झालेल्या चिमुकलीचे नाव आहे. तिच्यावर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शिरूर नगर परिषदेच्या प्रचारासाठी पुण्याकडून शिरूरकडे निघालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्या गाडीने चार वर्षाच्या चिमुकलीला धडक दिली. ही घटना रविवारी (30 नोव्हेंबर) दुपारी पुणे-अहिल्यानगर महामार्गावर शिरूरच्या बोऱ्हाडेमळा येथे घडली. चिमुकली रस्ता ओलंडत असताना हा अपघात झाला. यावेळी तिच्यासोबत कोणीही नव्हते.
आमदार ज्ञानेश्वर कटके आपल्या मर्सिडीज गाडीतून वाघोली येथून शिरूरकडे नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी जात होते. शुभ्रा बोऱ्हाडे ही चार वर्षीय बालिका रस्ता ओलांडत असताना आमदार कटकेंच्या गाडीसमोर आली. ज्ञानेश्वर कटके यांच्या चालकाने तत्काळ ब्रेक मारून गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र गाडी भरधाव वेगात असल्याने शुभ्राला जोराची धडक बसली. यात ती चेंडूसारखी उडून काही फुट अंतरावर डांबरी रस्त्यावर पडली. यात तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. आहे. आमदार ज्ञानेश्वर कटके गाडीतून खाली उतरले व कार्यकर्त्यांसह त्याच कारमधून तिला रुग्णालयात दाखल केले. मात्र तिची प्रकृती गंभीर बनल्याने तिला पुण्याला हलवण्यात आले आहे. चिमुकलीच्या जबड्याला गंभीर दुखापत झाली आहे.
