पुणे. शहरात पुन्हा एकदा पीएमपीएल बस अपघाताची घटना समोर आली आहे. पुण्यातील वनाज चौकात पीएमपीएलच्या बसचा ब्रेक फेल झाल्याने भीषण अपघात झाला. नियंत्रण सुटलेल्या बसने महानगरपालिकेच्या कचरा उचलणाऱ्या गाडीला पाठीमागून जोरदार धडक दिली.

या धडकेत कचरा गाडीत काम करणारा एक कर्मचारी गंभीर जखमी झाला आहे. अपघातानंतर परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतकार्य करत जखमी व्यक्तीला जवळच्या रुग्णालयात हलवले.

जखमी कर्मचाऱ्याला सध्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती गंभीर असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

दरम्यान, हा संपूर्ण अपघात परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला असून, बसच्या ब्रेक फेल होण्यामागील नेमके कारण शोधले जात आहे.

दोन दिवसापूर्वी अप्पा बळवंत चौकात अपघात -

वर्दळीच्या आप्पा बळवंत चौकात पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड (PMPML) ची एक बस अनियंत्रित होऊन लग्न पत्रिका छपाईच्या दुकानाला धडकली, त्यामुळे कामगार आणि वाटसरूंमध्ये घबराट पसरली. ही घटना 21 एप्रिल रोजी दुपारी घडली. 

    बस अचानक रस्त्यावरून दुकानाच्या दिशेने भरकटली आणि मोठ्या आवाजासह इमारतीला धडकली. दुकानाबाहेर पार्क केलेल्या एका दुचाकीचे नुकसान झाले. दुकान मालकाने नुकसानीची तक्रार केली आणि नुकसान भरपाईची मागणी केली आहे. सुदैवाने, या भीषण धडकेत कोणीही जखमी झाले नाही. मात्र, या धडकेमुळे रस्त्यावर थोड्या वेळासाठी वाहतूक कोंडी झाली.

    या घटनेमुळे पीएमपीएलच्या बसच्या देखभाल आणि सुरक्षेच्या मुद्द्यावर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.