जेएनएन, पुणे. मावळ तालुक्यातील पाटण गावात आज (6 जुलै) पहाटे एका घरावर दरड कोसळल्याची घटना घडली आहे. प्राथमिक माहितीनुसार, संबंधित घरातील संपूर्ण कुटुंब ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

तहसीलदार घटनास्थळी दाखल

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी (DDMO), पुणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेची माहिती मिळताच मावळचे तहसीलदार घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य सुरू करण्यात आले आहे.

या घटनेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) च्या पुणे येथील 5 व्या बटालियनची मदत मागविण्यात आली आहे. त्यानुसार निरीक्षक रविंदर यांच्या नेतृत्वाखाली आणि सहाय्यक कमांडंट चंद्रकेतू शर्मा यांच्या देखरेखीखाली 30 सदस्यांचे (1 अधिकारी, 2 वरिष्ठ अधिकारी व 27 जवान) पथक आवश्यक आपत्ती व्यवस्थापन साहित्यांसह सकाळी 5.50 वाजता घटनास्थळाकडे रवाना झाले.

सध्या बचावकार्य सुरू असून, अधिकृतरीत्या कोणतीही जीवितहानी झाल्याची नोंद झालेली नाही.

पुणे जिल्ह्यातील नागरिकांसाठी महत्त्वाचे आपत्ती व्यवस्थापन संपर्क क्रमांक

    सध्याच्या आपत्कालीन परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी खालील आपत्ती व्यवस्थापन हेल्पलाईन क्रमांक जवळ ठेवावेत. 

    पुणे जिल्हाधिकारी कार्यालय – जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष 

    • लँडलाईन : 020-26123371
    • टोल फ्री हेल्पलाईन : 1077
    • मोबाईल : 9370960061

    पुणे महानगरपालिका (PMC)

    • 020-25501259
    • 020-25506800

    पिंपरी-चिंचवड महानगरपालिका (PCMC)

    020-67331111 

    पुणे-मुंबई आणि मुंबई-पुणे वाहतूक थांबवण्यात आली

    भूस्खलन आणि सततच्या मुसळधार पावसामुळे पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग (Expressway) आणि जुना मुंबई-पुणे महामार्ग या दोन्ही मार्गांवरील वाहतुकीवर गंभीर प्रभावित झाली आहे. पुढील सूचना मिळेपर्यंत दोन्ही दिशांची (पुणे-मुंबई आणि मुंबई-पुणे) वाहतूक थांबवण्यात आली आहे.

    पुण्यात  रेड अलर्ट (Pune Rain Alert)

    हवामान विभागाने (IMD) पुणे जिल्ह्यात घाट भागात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. तर शहर परिसरात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुण्यात सध्या पावसाची संततधार सुरु आहे. तर खडकवासला धरणाच्या धरणप्रवणक्षेत्रात पाऊस होत असल्याने पाणीसाठ्यात वाढ होत आहे