जेएनएन, पुणे. पुण्यामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे (NCP SP) आमदार बापूसाहेब पठारे (MLA Bapusaheb Pathare) यांना धक्काबुक्की व मारहाण झाली, अशी माहिती त्यांच्या पक्षाच्या कार्यकारी अध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी ट्वीटद्वारे दिली आहे.

मारहाण झाल्याची घटना निषेधार्ह

आमदार बापूसाहेब पठारे यांना धक्काबुक्की व मारहाण झाल्याची ही घटना निषेधार्ह आहे. सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते जनतेने निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींवर हल्ला करतात हे सुदृढ लोकशाहीचे लक्षण नाही. आम्ही सर्वजण या घटनेचा कठोर शब्दांत निषेध करतो, असं सुळे यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. 

कठोरात कठोर कारवाई करावी 

आमदार पठारे यांच्यावर हल्ला करणाऱ्या व्यक्तींवर कठोरात कठोर कारवाई करावी अशी आमची मागणी आहे. लोकांनी निवडून दिलेले लोकप्रतिनिधी देखील या राज्यात सुरक्षित नाहीत ही मोठी चिंताजनक आणि गृहखात्यासाठी नामुष्कीची बाब आहे, अशी टीका त्यांनी गृहमंत्रालयावर केली आहे.

काय आहे प्रकरण

    शनिवारी संध्याकाळी लोहगावच्या वाघोली रोडवर एका माजी सैनिकाच्या सत्काराचा कार्यक्रम लॉन्सवर ठेवण्यात आला होता. त्यासाठी आमदार बापू पठारे तिथे येणार होते. त्याच कार्यक्रमात लोहगाव ग्रामपंचायतीचे माजी सभापती बंडू खांदवे बाहेर येत असताना पठारे यांची एन्ट्री झाली. यावेळी दोघांमध्ये शा‍ब्दिक वाद झाला.

    परिसरात मोठा तणाव

    त्यानंतर दोन्ही बाजूने झटापट सुरू झाली. पठारे यांना धक्काबुक्की झाल्याचे कळताच त्यांचे समर्थकही तिथे दाखल झाले. खांदवे यांचे समर्थकही तिथे होते. त्यामुळे परिसरात मोठा तणाव वाढला होता.