जेएनएन,पुणे: विद्येचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. शहरातील अत्यंत गजबजलेल्या शिवाजीनगर न्यायालयाच्या गेट क्रमांक ४ बाहेर भरदिवसा एका तरुणावर गोळीबार करून कोयत्याने वार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यात कात्रज येथील रहिवासी मंदार किवळे हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. त्याला तातडीने उपचारासाठी ससून सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे.

न्यायालयाच्या परिसरात वर्दळ असतानाच हा हल्ला झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. भरदिवसा न्यायालयाच्या प्रवेशद्वाराबाहेरच गोळीबार आणि धारदार शस्त्राने हल्ला झाल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

दोन्ही हातांना गंभीर दुखापत, कवटीला फ्रॅक्चर
ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. येल्लाप्पा जाधव यांनी मंदार किवळेच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. मंदारच्या दोन्ही हातांना गंभीर दुखापत झाली असून, हातांच्या हाडांना फ्रॅक्चर झाले आहे. तसेच डोक्याच्या मागील बाजूस गंभीर दुखापत झाली असून, कवटीच्या तळाला फ्रॅक्चर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

या हल्ल्यात मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने रुग्णालयात दाखल करताना त्याचा रक्तदाब ८०/६० इतका खाली आला होता. उपचारादरम्यान सलाईन आणि अन्य वैद्यकीय उपाय केल्यानंतर रक्तदाब १००/७० पर्यंत सुधारला. डॉक्टरांच्या माहितीनुसार, मंदार शुद्धीवर असून बोलण्यास आणि प्रतिसाद देण्यास सक्षम आहे. मात्र, कवटीला झालेल्या फ्रॅक्चरमुळे मेंदूमध्ये अंतर्गत रक्तस्राव झाला आहे का, याची तपासणी सुरू आहे.

जनरल सर्जरी, ऑर्थोपेडिक, प्लास्टिक सर्जरी आणि न्यूरोसर्जरी अशा विविध विभागांतील तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक त्याच्यावर उपचार करत आहे. पुढील ७२ तास त्याच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे. त्याला पुढील उपचारांसाठी शस्त्रक्रिया विभागात नेण्याची तयारीही करण्यात आली होती. त्यामुळे सध्या त्याच्या प्रकृतीबाबत कोणताही ठोस अंदाज व्यक्त करणे घाईचे ठरेल, असे डॉक्टरांनी सांगितले.

सहा जणांचे टोळके, दोन दुचाकींवरून आले होते हल्लेखोर
माहितीनुसार, हल्लेखोर दोन दुचाकींवरून आले होते. त्यांच्या हातात पिस्तुले आणि कोयत्यासारखी धारदार शस्त्रे होती. त्यांनी मंदारवर हल्ला केला. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, हल्लेखोरांनी आधी गोळीबाराचा प्रयत्न केला आणि त्यानंतर कोयत्याने त्याच्यावर सपासप वार केले. या हल्ल्यात त्याच्या हातांना गंभीर दुखापत झाली.

    हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. पोलिसांनी घटनास्थळावरून दोन पिस्तुले आणि इतर पुरावे ताब्यात घेतले आहेत. गोळीबार प्रत्यक्ष झाला की गोळ्या झाडण्याचा प्रयत्न करण्यात आला, याबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे.

    मंदार किवळे खून प्रकरणातील आरोपी
    या हल्ल्याला पूर्ववैमनस्याची पार्श्वभूमी असल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे. मंदार किवळे याच्यावर 2025 मध्ये कात्रज परिसरात झालेल्या शुभम चव्हाण हत्या प्रकरणात गुन्हा दाखल आहे. या प्रकरणात तो तिसरा आरोपी असल्याची माहिती आहे. तो नुकताच जामिनावर बाहेर आला होता.

    विशेष म्हणजे, २५ नोव्हेंबर रोजी त्याच्या खटल्याची सुनावणी नियोजित होती. न्यायालयीन कामकाजासाठी तो परिसरात आला असताना त्याच्यावर हा हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या हल्ल्याचा संबंध जुन्या गुन्ह्यातील वैमनस्याशी आहे का, या दिशेनेही पोलीस तपास करत आहेत.