जेएनएन, पुणे. Jejuri Khandoba Temple News: महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या श्री क्षेत्र खंडोबा देवाच्या दर्शनासाठी जेजुरी गडावर येणाऱ्या भाविकांसाठी आजपासून वस्त्र संहिता लागू करण्याचा निर्णय देवस्थान ट्रस्टने घेतला. त्यासाठी नियमावलीही जाहीर करण्यात आली आहे. यापुढे मंदिरात दर्शनासाठी भारतीय वेशभूषा परिधान करणे आवश्यक असेल.
कमी कपड्यांमध्ये प्रवेश मिळणार नाही
भारतीय वेशभूषा असेल तरच भाविकांना प्रवेश मिळेल असा निर्णय श्री मार्तंड देव संस्थान, जेजुरीच्या विश्वस्त मंडळाच्या वतीने घेण्यात आला आहे. पुरूष व महिला भाविकांना मंदिरांत कमी कपड्यांमध्ये प्रवेश मिळणार नाही, असंही स्पष्ट करण्यात आले आहे.
फाटक्या जीन्स, बरमुडा, शॉर्ट, स्कर्टवर प्रवेश नाही
फॅशन म्हणून वापरण्यात येणाऱ्या फाटक्या जीन्स, बरमुडा, शॉर्ट, स्कर्ट असा व तत्सम कपडे घालून देव दर्शनास गडावर येण्यास मज्जाव केला जाणार आहे.
हेही वाचा - Chatrapati Sambhaji Nagar Blast: छत्रपती संभाजी नगर सिलेंडरच्या स्फोटाने हादरले, पाच दुकाने जळून खाक
मार्तंड देवस्थानचे विश्वस्त मंगेश घोणे म्हणाले…
याविषयी बोलताना श्री मार्तंड देवस्थानचे विश्वस्त मंगेश घोणे म्हणाले की, "मंदिराची पावित्र्य, शालीनता जपणारी वेशभूषा भाविकांकडून अपेक्षित आहे. गुडघ्याच्या वरती असणारे किंवा आखूड- कमी कपडे अपेक्षित नाहीत. असे कपडे न घालण्याचं नम्र आवाहन सर्व विश्वस्त मंडळाच्या वतीने भाविकांना करण्यात आले आहे. महिला आणि पुरुष दोघांसाठी हे नियम सारखेच असणार आहेत. दरम्यान दर्शनासाठी येताना भाविकांनी कोणत्याही प्रकारचे भारतीय पारंपरिक वेशभूषा केलेली चालणार आहे.