जेएनएन, पुणे: देशातील कचरा वेचकांना सामाजिक आणि आर्थिक सन्मान मिळावा, त्यांचे जीवनमान उंचावे आणि त्यांना सुरक्षित रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने केंद्र सरकारच्या ‘NAMASTE’ (National Action for Mechanized Sanitation Ecosystem) योजनेच्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात पुण्यापासून करण्यात आली. केंद्र सरकारतर्फे अधिकृत नोंदणी आणि सामाजिक सुरक्षा योजनांचे फायदे या योजनेद्वारे कचरा वेचकांना मिळतील. यासाठी स्वच्छ संस्था, पुणे महानगरपालिका आणि कष्टकरी पंचायत यांनी पुढाकार घेत पुण्यातील नोंदणी शिबिरास आज सुरुवात केली.
कचरा वेचकांना आणि त्यांच्या कामाला नसलेली ओळख, असुरक्षित कामाची परिस्थिती आणि सामाजिक सुरक्षा योजनांचा आभावाने मिळणारा लाभ यांसारख्या आव्हानांचा सामना करावा लागतो. NAMASTE योजना हे गंभीर प्रश्न सोडवण्यासाठी उचललेले महत्त्वाचे पाऊल आहे आणि असंघटित कचरा वेचकांच्या घनकचरा व्यवस्थापनाच्या मुख्य प्रवाहात (SWM) समावेशासाठी सक्ती करते. हा महत्त्वाचा टप्पा कचरा वेचकांच्या अदृश्य परंतु अमूल्य योगदानाची अधिकृतपणे दखल घेईल आणि त्यांना अधिक सुरक्षित, सन्मानजनक आणि शाश्वत उपजीविकेसाठी सक्षम करेल.
केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयाने, गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालय, पंचायती राज मंत्रालय आणि पेयजल व स्वच्छता विभाग यांच्या सहकार्याने राष्ट्रीय सफाई कर्मचारी वित्त आणि विकास महामंडळ (NSKFDC) मार्फत या योजनेची अंमलबजावणी सुरू केली आहे. अर्बन मॅनेजमेंट सेंटर (UMC) आणि UNDP हे या उपक्रमाला तांत्रिक सहाय्य करत आहेत.
पुणे महानगरपालिका आणि स्वच्छ संस्थेचा पुढाकार
NAMASTE योजनेची अंमलबजावणी करणारी पुणे महापालिका ही देशातील पहिली शहरी स्थानिक संस्था ठरली आहे. महापालिकेच्या पुढाकारामुळे ‘स्वच्छ (SWaCH) आणि कष्टकरी पंचायत’ यांसारख्या संस्थांच्या सहकार्याने कचरा वेचकांना औपचारिकरित्या घनकचरा व्यवस्थापनात सामील करून त्यांना सन्मानजनक व सुरक्षित रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. योजनेच्या अंमलबजावणीचा पहिला टप्पा म्हणून, 26 मार्च 2025 रोजी पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन, आर्ट गॅलरी, घोले रोड, पुणे येथे विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
स्वच्छ संस्थेच्या सहकार्याने पुणे महानगरपालिकेने कचरा वेचकांना घनकचरा व्यवस्थापनात सहभागी करून घेण्यामध्ये देशात पुढाकार घेतला. मागील 20 वर्षांच्या या भागीदारीची दखल घेत केंद्र सरकारच्या NAMASTE योजनेची आज पुण्यात सर्वप्रथम सुरूवात झाली, याचा आम्हाला अभिमान वाटतो. या एकत्र येऊन केलेल्या प्रयत्नांमधून इतर शहरांना देखील प्रेरणा मिळेल. ‘NAMASTE’ सारख्या उपक्रमांद्वारे कचरा वेचकांसोबतची आमची भागीदारी आणखी मजबूत करण्याचा आमचा प्रयत्न राहील" - अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त पृथ्वीराज बी. पी
“मागील 30 वर्षांत पुण्यातील कचरावेचकांनी संघर्ष करून ओळखपत्र आणि इतर कामगारांप्रमाणे सरकारी योजनांचा हक्क मिळवला. पुणे महानगरपालिकेसोबत काम करताना आम्हाला व आमच्या कामाला मान्यता मिळाली, आणि आता NAMASTE योजनेद्वारे केंद्र सरकारमार्फत आमची कामगार म्हणून अधिकृत नोंदणी होत आहे. हे आमचा आत्मसन्मान उंचावण्यासाठी आणि सामाजिक सुरक्षेच्या योजनांचा लाभ मिळण्यासाठी उचललेले महत्त्वाचे पाऊल आहे,” अशा भावना स्वच्छ च्या कचरा वेचक प्रतिनिधी सारिका क्षीरसागर यांनी व्यक्त केल्या.
‘NAMASTE Waste Picker Portal’ आणि मोबाईल ॲप्लिकेशनद्वारे आज 50 हून अधिक कचरा वेचकांची नोंदणी करण्यात आली. यापुढेही कचरा वेचकांची नोंदणी नियमितपणे सुरू राहणार आहे. कचरा वेचकांसाठी सुरक्षित आणि सन्मानजनक रोजगाराचा मार्ग या योजने अंतर्गत त्यांना प्राप्त होणार आहे. कचरा वेचक हे शहराच्या स्वच्छतेचे खरे शिल्पकार आहेत, मात्र आजवर त्यांना अधिकृत मान्यता मिळाली नव्हती. NAMASTE योजनेमुळे त्यांना शासकीय योजनांचा लाभ, आरोग्य आणि सामाजिक सुरक्षा, तसेच पर्यायी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
हेही वाचा: फडणवीस यांची मोठी घोषणा, आता राज्यात या EV गाड्यांवर लागणार नाही 6% टॅक्स