जेएनएन, पंढरपूर.Ashadhi Ekadashi 2026: आषाढी एकादशीनिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक केली. यावेळी पंढरपूर मंदिर परिसर विकासाबाबत महत्त्वाची घोषणा करत त्यांनी, "पंढरपूर कॉरिडॉरचे काम कोणावरही अन्याय न करता आणि सर्वांचे योग्य पुनर्वसन करून येत्या अडीच वर्षांत पूर्ण केले जाईल," अशी ग्वाही दिली.

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने आयोजित सत्कार समारंभात बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, दरवर्षी विठ्ठलाच्या दर्शनासाठी भाविकांची संख्या वाढत असून, त्यांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मंदिर परिसराचा सर्वांगीण विकास आवश्यक आहे. त्यासाठी पंढरपूर कॉरिडॉर उभारण्यात येणार असून, या प्रकल्पात स्थानिक नागरिक, व्यापारी आणि भाडेकरू यांच्या हिताचाही विचार करण्यात आला आहे.

मुख्यमंत्री म्हणाले, "कॉरिडॉरमुळे व्यावसायिकांचा व्यवसाय वाढेल, नागरिकांना घरे मिळतील आणि भाडेकरूंसाठीही योग्य व्यवस्था केली जाईल. हा विकास प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर कितीही भाविक आले तरी त्यांना दर्शन आणि इतर सुविधांचा उत्तम अनुभव मिळेल."

यंदाच्या वारीने मोडला विक्रम
यंदाच्या आषाढी वारीत दर्शनासाठी तब्बल २५ किलोमीटरहून अधिक लांबीची रांग लागल्याचे सांगत मुख्यमंत्री म्हणाले की, दर्शनासाठी २५ तासांचा कालावधी लागत असतानाही वारकरी विठ्ठलनामाच्या गजरात आनंदाने प्रतीक्षा करत होते. ही वारकरी परंपरेची ताकद असल्याचे त्यांनी नमूद केले.

चंद्रभागा नदी परिसरातील स्वच्छतेचेही त्यांनी कौतुक केले. पालकमंत्री आणि प्रशासनाने केलेल्या नियोजनामुळे वाळवंट परिसर स्वच्छ राहिला असून भाविकांना चांगल्या सुविधा उपलब्ध झाल्याचे त्यांनी सांगितले.

वारकऱ्यांची सेवा म्हणजे विठुरायाची सेवा

    वारकरी परंपरेचे महत्त्व अधोरेखित करत मुख्यमंत्री म्हणाले, "वारीत सहभागी होणारा प्रत्येक वारकरी हा शेतकरी, शेतमजूर, बारा बलुतेदार, उद्योजक अशा विविध क्षेत्रांतील असतो. विठुरायाची प्रत्यक्ष सेवा करता आली नाही, तरी वारकरी आणि शेतकऱ्यांची सेवा केली तर तीच सेवा विठुरायापर्यंत पोहोचते."

    यावेळी त्यांनी राज्य सरकारच्या शेतकरी हिताच्या निर्णयांचाही उल्लेख केला. ५६ लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी, मोफत वीज आणि थकीत वीजबिले माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याचे त्यांनी सांगितले.

    शासकीय महापूजा आणि मानाच्या वारकऱ्यांचा सन्मान
    यंदाच्या शासकीय महापूजेचा मान धाराशिव जिल्ह्यातील गौरगाव येथील बाबासाहेब माधव माने आणि प्रभावती माने या दाम्पत्याला मिळाला. महापूजेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच राज्य परिवहन महामंडळाकडून त्यांना वर्षभरासाठी मोफत एसटी प्रवासाचा पास प्रदान करण्यात आला.

    'श्री विठ्ठल निर्मल दिंडी' पुरस्कारांचे वितरण

    मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते पर्यावरण संरक्षण, स्वच्छता, प्लास्टिकमुक्त वारी आणि वृक्षसंवर्धनाचा संदेश देणाऱ्या दिंड्यांना 'श्री विठ्ठल निर्मल दिंडी' पुरस्कार प्रदान करण्यात आले.

    पुरस्कार विजेते:

    प्रथम क्रमांक: श्री विठ्ठल-रुक्मिणी संस्थान, कौंडण्यपूर

    द्वितीय क्रमांक: वारकरी धर्मसंकीर्तन सेवा प्रतिष्ठान, जालना

    तृतीय क्रमांक: गोऱ्हेकर संस्था, आळंदी देवाची

    यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर, आमदार, जिल्हाधिकारी, मंदिर समितीचे पदाधिकारी तसेच प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.