जेएनएन, पुणे. Pune Minor Girl Rape Murder Case: पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून खून केल्याची संतापजनक घटना घडली होती. या प्रकरणात आता पोलिसांनी आरोपी भीमराव कांबळे याच्याविरुद्ध विशेष न्यायालयात 1100 पानांचे दोषारोपपत्र शनिवारी दाखल करण्यात आले. यावेळी गिल, विशेष सरकारी वकील अजय मिसर आणि तपास अधिकारी पोलिस निरीक्षक विजयमाला पवार उपस्थित होत्या.

गुन्हा घडल्यानंतर अवघ्या 14 दिवसांत दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. घटनाक्रम, सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक पुरावे, प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांचे जबाब, वैद्यकीय अहवाल असे महत्त्वाचे पुरावे दोषारोपपत्रात जोडले आहेत. दोषारोपपत्रात आरोपीची संपूर्ण माहिती, त्याची गुन्ह्यातील भूमिका आणि घटनाक्रमाचा सविस्तर उल्लेख करण्यात आला आहे. विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी पुढील आठवड्यात या प्रकरणाची ट्रायल सुरू होणार असल्याची माहिती दिली.  

तपासादरम्यान परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक पुरावे गोळा केले. 50 हून अधिक साक्षीदारांचे जबाब नोंदविले आहेत. घटनेच्या वेळी परिसरात लपाछपी खेळणाऱ्या 10 ते 11 वर्षे वयोगटातील दोन मुलांनी आरोपीला गोठ्याकडे जाताना पाहिल्याचे समोर आले असून, हे दोघे महत्त्वाचे साक्षीदार ठरणार आहेत. दोषारोपपत्रात बालिकेचा शवविच्छेदन अहवालही जोडला आहे. आरोपीने बालिकेच्या तोंडात बोळा कोंबल्याचे, तसेच तिच्या शरीरावर जखमा आढळल्याचे नमूद केले आहे. 

दोषारोपपत्रात असलेले पुरावे

  • घटनाक्रमाचे वर्णन
  • घटनास्थळ आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज
  • घटने संदर्भातील 50 हून अधिक फोटो
  • 50 हून अधिक साक्षीदारांचे जबाब
  • न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेचे अहवाल
  • वैद्यकीय पुरावे
  • आरोपीने दिलेला जबाब
  • तांत्रिक तपास व त्याचे अहवाल

काय आहे प्रकरण 

नसरापूर गावात सुट्टीसाठी आलेल्या साडेतीन वर्षांच्या चिमुकलीचे 65 वर्षीय आरोपी कांबळे याने तिचे अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केली होती. या घटनेची संपूर्ण राज्यात संतापाची लाट पसरली. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत भीमाजी कांबळेला अटक केली. 

    दरम्यान, बालिकेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठविण्यात आला होता. त्यात मुलीच्या शरीरावर जखमा आढळल्या. श्वास गुदमरून तिचा मृत्यू झाल्याचे तपासात निष्पन्न झाले.