जेएनएन, पुणे. Pune Rape Case: पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर गावात घडलेल्या अत्यंत संतापजनक घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. महाराष्ट्र दिनाच्या दिवशी, शुक्रवारी एका 65 वर्षीय व्यक्तीने साडेतीन वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेनंतर गावात संतापाची लाट उसळली असून आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा देण्याची जोरदार मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.

या प्रकरणातील आरोपीचा सीसीटीव्ही फुटेज समोर आला असून त्यामध्ये तो चिमुरडीला सोबत घेऊन जाताना स्पष्टपणे दिसत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने चिमुरडीला “गाईचं वासरू दाखवतो” असे आमिष दाखवत तिचा हात धरून जवळच्या गोठ्यात नेले. तेथे त्याने तिच्यावर अत्याचार करून नंतर तिची हत्या केली. 

घटना उघडकीस आल्यानंतर संपूर्ण नसरापूर गाव संतप्त झाले. ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने एकत्र येत आरोपीविरोधात तीव्र निषेध व्यक्त केला. गावात तणावपूर्ण शांतता असून पोलिसांनी अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला आहे. 

पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल यांनी पत्रकार परिषदेत या घटनेचा घटनाक्रम स्पष्ट केला. त्यांनी सांगितले की, आरोपीची गुन्हेगारी पार्श्वभूमी असून यापूर्वीही त्याच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि अन्य पुराव्यांच्या आधारे आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याकडून सखोल चौकशी सुरू आहे.

या अमानुष घटनेमुळे राज्यभरातून संताप व्यक्त होत आहे. विविध सामाजिक संघटना, महिला संघटना आणि नागरिकांनी आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.