जेएनएन, मुंबई. आज बारामती विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर होत असताना आपण सर्वांनी आपल्या मतांमधून दाखवलेला विश्वास आदरणीय अजित पवारांच्या पवित्र स्मृतींना समर्पित करते अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी 'एक्स' वर ट्वीट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.  

‘कुणीही मिरवणुका काढू नयेत’

आजचा हा निकाल जाहीर होत असताना आदरणीय दादांच्या आठवणींना उजाळा मिळाल्याने आपण सर्वजण भावूक आहोत. दादांवर जीवापाड प्रेम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना, या विजयाचा जल्लोष म्हणून कुणीही मिरवणुका काढू नयेत किंवा गुलाल उधळू नये. आपण संयम राखूया आणि दादांच्या विचारांना साजेसं वर्तन करूया अशी विनंती सुनेत्रा अजित पवार यांनी केली आहे. 

‘ही तर फक्त सुरुवात’

दादांच्या स्वप्नातील बारामती घडवण्याची संधी दिल्याबद्दल  सर्व बारामतीकरांचे मनःपूर्वक आभार मानतानाच हा शेवट नाही, ही तर फक्त सुरुवात आहे.  निर्धाराची, संघर्षाची आणि नव्या बारामतीची.. ! असा विश्वासही सुनेत्रा अजित पवार यांनी बारामतीकरांना दिला आहे.

सुनेत्रा पवारांची जबरदस्त आघाडी

    बारातमी पोटनिवडणुकीच्या सोमवारी मतमोजणीच्या सहाव्या फेरीअखेर पवार यांनी 53,478 मते मिळवली, तर इतर 22 पैकी 21 अल्पपरिचित उमेदवारांना अद्याप 200 मतांचा टप्पाही ओलांडता आलेला नाही. बारामती विधानसभा मतदारसंघात 58.27 टक्के मतदानाची नोंद झाली.

    राहुरीत भाजपाचे अक्षय कर्डिले आघाडीवर

    राहुरीत मतमोजणी सुरु असून आतापर्यंत तीन फेरा झाल्या आहेत. 

    • भाजप अक्षय कर्डिले - 16852
    • राष्ट्रवादी SP गोविंद मोकाटे- 2141
    • वंचित संतोष चोळके- 1022

     तिसऱ्या फेरी अखेर भाजपचे अक्षय कर्डीले 14711 मतांनी आघाडीवर आहेत.