मुंबई/बारामती. Baramati Byelection 2026 Congress: राज्याच्या राजकारणात चर्चेचा केंद्रबिंदू ठरलेल्या बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत नवा ट्विस्ट समोर आला आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बिनविरोध निवडणुकीसाठी केलेले प्रयत्न अखेर अपयशी ठरले असून काँग्रेसने स्वतःचा उमेदवार रिंगणात उतरवत सामना रंगतदार बनवला आहे.

महायुतीकडून ही निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी सुनेत्रा पवार यांनी शिवसेना (UBT) प्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याशी थेट संपर्क साधून पाठिंबा देण्याची विनंती केली होती. मात्र, या प्रयत्नांना फारसे यश आले नाही.

आज दोन्ही उमेदवार भरणार अर्ज -

रविवारी दिल्लीतून काँग्रेसने अधिकृत घोषणा करत आकाश मोरे यांना उमेदवारी दिली. त्यामुळे बारामतीतील लढत आता अधिक चुरशीची होणार आहे. आज सुनेत्रा पवार आणि आकाश मोरे हे दोघेही उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. या पोटनिवडणुकीसाठी आतापर्यंत 19 उमेदवारांनी अर्ज दाखल केले असून, ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांच्या उमेदवारीचीही चर्चा आहे. त्यामुळे उमेदवारांची संख्या 20 च्या पुढे जाण्याची शक्यता आहे.

अर्ज माघारीसाठी काँग्रेसची अट -

दरम्यान, काँग्रेसचे उमेदवार आकाश मोरे यांनी निवडणुकीतून माघार घेण्यासाठी महत्त्वाची अट पुढे ठेवली आहे. त्यांनी स्पष्ट केले की, “लोकशाही टिकवण्यासाठी आम्ही निवडणूक लढवत आहोत. आमचा मुख्य राजकीय विरोधक भाजप आहे. मात्र, अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या तपासाचा मुद्दा अत्यंत गंभीर आहे. जर राज्य सरकारने या प्रकरणात गुन्हा दाखल केला, तर उमेदवारी मागे घेण्याबाबत पुनर्विचार करू.

    या विधानामुळे राजकीय वातावरण अधिक तापले असून, महायुती सरकार काँग्रेसची ही अट मान्य करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

    दरम्यान, मतदान 23 एप्रिल रोजी होणार असून 4 मे रोजी निकाल जाहीर केला जाणार आहे. सध्याच्या घडीला सुनेत्रा पवार यांचे पारडे जड मानले जात असले, तरी धनगर आणि ओबीसी मतांच्या समीकरणांमुळे निकालात अनपेक्षित बदल होण्याची शक्यता राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत.

    बारामती हा पारंपरिकदृष्ट्या अजित पवार यांचा बालेकिल्ला राहिला आहे. त्यामुळे ही परंपरा कायम राखण्यासाठी सुनेत्रा पवार यांच्यासमोर मोठे आव्हान असणार आहे.

    सुनेत्रा पवारांविरुद्ध काँग्रेसकडून आकाश मोरे मैदानात-

    बारामती हा पारंपरिकदृष्ट्या राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. त्यामुळे या मतदारसंघातील लढत नेहमीच प्रतिष्ठेची ठरते. यंदाच्या पोटनिवडणुकीतही महाविकास आघाडी आणि इतर पक्षांमधील समीकरणांमुळे चुरस वाढण्याची शक्यता आहे. काँग्रेसने स्थानिक पातळीवर मजबूत चेहरा म्हणून आकाश मोरे यांची निवड केल्याचं बोललं जात आहे. दुसरीकडे सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीमुळे राष्ट्रवादीकडूनही जोरदार प्रचार सुरू होण्याची चिन्हं आहेत.

    आगामी काळात प्रचारसभा, नेत्यांचे दौरे आणि स्थानिक मुद्द्यांवरून बारामतीतील राजकीय वातावरण अधिक तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.