जेएनएन, पंढरपूर: आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्रातून लाखो वारकरी पंढरपूरकडे प्रस्थान करत आहेत. विठ्ठलाच्या दर्शनासाठी भाविकांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण असतानाच एका अनामिक भक्ताने श्री विठ्ठलाच्या चरणी अर्धा किलो वजनाच्या सोन्याच्या पादुका अर्पण करून आपली अखंड भक्ती व्यक्त केली आहे.
या सोन्याच्या पादुकांची अंदाजे किंमत सुमारे 56 लाख रुपये असल्याचे सांगितले जात असून, या अनोख्या अर्पणाची सर्वत्र चर्चा रंगली आहे.
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या सोने-चांदी विभागाचे प्रमुख राजेंद्र सुभेदार यांनी दिलेल्या माहितीनुसार, श्री विठ्ठलाच्या चरणी सोन्याच्या पादुका अर्पण करण्याची ही पहिलीच घटना आहे. विशेष म्हणजे, या पादुका तयार करताना विठ्ठलाच्या चरणांचे कोणतेही माप घेण्यात आले नव्हते. तरीही त्या विठ्ठलाच्या चरणांना अगदी अचूक आणि चपखल बसल्या, अशी माहिती त्यांनी दिली.
मंदिर प्रशासनाच्या माहितीनुसार, या सोन्याच्या पादुका प्रमुख उत्सव, धार्मिक समारंभ आणि विशेष पूजांच्या वेळी श्री विठ्ठलाला परिधान करण्यात येणार आहेत. त्यामुळे या पादुकांचे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व अधिक वाढले आहे.
हेही वाचा: विठ्ठल, विठोबा आणि पांडुरंग नावांचा अर्थ ... पंढरपूरच्या दैवताला इतकी नावे का? जाणून घ्या प्रत्येक नावामागील इतिहास आणि अर्थ
