जेएनएन, जुन्नर /पुणे: ग्रामीण जिल्ह्यामध्ये बेकायदेशीररित्या पिस्तूल बाळगणाऱ्याला अटक करून कारवाई करण्याचे आदेश पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला दिले होते. 21 सप्टेंबर रोजी पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्या आदेशानुसार राजगुरूनगर विभागात पेट्रोलिंग केले.

राजगुरूनगर गावच्या हद्दीत पुणे-नाशिक हायवे लगत होलेवाडी येथील पुलाखाली प्रथमेश बोऱ्हाडे हा इसम त्याच्या एका साथीदारासह येणार असून त्यांच्या जवळ एक गावठी पिस्तूल असल्याची माहिती मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार गुन्हे शाखेच्या पथकाने सदर ठिकाणी सापळा रचून प्रथमेश रमेश बोऱ्हाडे वय 25 वर्ष रा.पाबळ रोड, राजगुरुनगर, सुनील बबन पाचपुते वय 26 रा.चींचोशी ता.राजगुरुनगर यांना ताब्यात घेऊन त्यांच्या अंगाची झडती घेतली असता सुनील बबन पाचपुते याच्या कमरेला एक गावठी कट्टा दिसला. गावटी कट्ट्या बाबत विचारपूस केली असता सदर कट्टा प्रथमेश बोऱ्हाडे याने दिल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी या प्रकरणात कट्टा आणि आरोपींना ताब्यात घेऊन राजगुरूनगर पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला आहे.